आभाळमाया – क्वेसारची गोष्ट

>> वैश्विक, [email protected]

निरभ्र आणि काळोख्या आकाशात आपल्या एका रात्रीत सुमारे सहा हजार तारे दिसतात. पण सध्याचे दिवस पावसाचे. देशभर सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. हा लेख लिहीत असतानाही खिडकीबाहेरचा धो धो पाऊस दिसतोय. अगदी असा पाऊस पडला नाही आणि आकाशात विरळ ढग असले तरी तारांगण दृष्टीआड होते. मग आता तर काय, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ अशी स्थिती. अशा वेळी प्रत्यक्ष आकाशदर्शन अशक्यच. परंतु नोव्हेंबरपासून किंवा दिवाळीतल्या अमावस्येनंतरच्या पहिल्या शनिवारी सुरू होणाऱ्या खगोल मंडळाच्या आमच्या रात्रभराच्या कार्यक्रमांची पूर्वतयारी आम्ही पावसाळ्यात करून घेतो. त्यासाठी काही खगोलीय संकल्पना सोप्या शब्दात शिकवण्याचा प्रयत्न करतो. विश्वरचना जाणून घ्यायला, विज्ञान शाखेचे विद्यार्थी असावेच लागते असे नाही. मीसुद्धा नाही. परंतु गेल्या 39 वर्षांत मला अनेक खगोलीय संकल्पना, त्यातील क्लिष्ट वाटणारं गणित वगळताही समजल्या आहेत. उदाहरणार्थ पृथ्वी सूर्याभोवती सेकंदाला 30 कि.मी. या गतीने फिरते आणि आपली संपूर्ण सूर्यमाला, आपल्या आकाशगंगेच्या केंद्राशी असलेल्या विराट कृष्णविवराभोवती सेकंदाला 220 कि.मी. वेगाने फिरते. म्हणजे क्षणोक्षणी आपण सर्व अंतराळात किमान 250 कि.मी. वेगाने भिरभिरतोय हे कळायला काही क्लिष्ट गणिताची गरज नाही. उलट गमतीजमतीच्या गाण्यांमधून आणि कोडय़ांमधूनही हे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना जाणून घेता येईल.

आपण ‘स्पेस एज’मध्ये असल्याचे अभिमानाने सांगतो. मग त्या स्पेसची आपल्या सूर्यमालेसकट थोडी तरी माहिती असायला नको? ‘विश्वची माझे घर’ ही आपली सांस्कृतिक संकल्पना. त्या वैश्विक घराचे कानेकोपरे जाणून घ्यायलाच हवेत. उत्साहाने तसे ठरवले तर विश्व किती अमेझिंग, विस्मयकारी आहे हे प्रत्येक टप्प्यावर समजेल.

एका रात्रीत सगळेच्या सगळे सहा हजार तारे समजून घेणे अशक्य. त्यातील काही दूरस्थ तारे आणि तारकागुच्छ तर दुर्बिणीतूनही जेमतेम दिसणारे. परंतु तरीही कितीतरी ताऱयांचे दर्शन आणि त्यांच्या स्वरूपाविषयीचे वैज्ञानिक ज्ञान आपल्याला आकाशदर्शन करताना मिळते. उदाहरणार्थ, आपला सूर्य हा आपल्या मिल्की-वे किवा आकाशगंगा या दीर्घिकेतील एक सामान्य तारा आहे आणि असे सुमारे 100 ते 200 अब्ज तारे आपल्या ज्या आकाशगंगेत सामावलेले आहेत, त्या विलक्षण दीर्घिकेचा धूसर पट्टा आपल्या नुसत्या डोळय़ांनीही दिसतो. प्रशस्त घरात किंवा प्रासादात राहूनच त्याचा कानाकोपरा पाहवा तशीच ही स्थिती. आकाशगंगा पाहताना आपण याच धूसर पट्टय़ात आहोत हे विसरून जातो.

आजच्या आणि पुढच्या लेखात आपण ताऱ्यांच्या काही महत्त्वाच्या प्रकारांसंबंधी माहिती घेऊया. काही प्रकारचे तारे हे स्कंदक तारे असतात तर काही ताऱ्यांसारखे म्हणजे ‘किंतारा’ या स्वरूपात येतात. या किंताऱयांना ‘क्वेसार’ किंवा ‘क्वासी स्टेलर ऑब्जेक्ट’ म्हणजे तारासदृश अवकाशीय वस्तू असे म्हटले जाते. त्याचा नावा शॉर्टफॉर्म अथवा संक्षिप्त रूप ‘क्यूएसओ.’ या ताऱ्यांचा गाभा अतिशय क्रियाशील (ऑक्टिव) तेजस्वितेची आवर्तने निर्माण करत असतो. ती ऊर्जा त्याला एका प्रचंड आकाराच्या कृष्णविवरापासून मिळत असते. अशा कृष्णविवरांचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या 10 अब्जपटही असू शकते.

1950 मध्ये या तारासदृश किंवा ताऱ्यासारख्या चमचमत्या वस्तूंचा शोध लागला. त्या ताऱ्यांसारख्या किंवा ‘क्वासी-स्लेटर’ असाव्यात हे जाणून त्याला ताऱ्याची उपाधी न देता पिंतारा असे म्हटले गेले. हबल अवकाश- दुर्बिण कार्यरत झाल्यानंतर लक्षात आले की एखाद्या दीर्घिकेच्या मध्यभागी असे ‘क्वेसार’ अथवा ‘कितारे’ अधिक दिसतात. अशा क्वेसारची तेजस्विता त्यांचे कृष्णविवर किती शक्तीचे आहे त्यावर अवलंबून असते. आतापर्यंत एकूण विश्वाच्या आपल्याला अवघ्या चार टक्के ज्ञात असलेल्या दृश्य (ऑब्जर्व्हेबल) पसाऱ्यात सुमारे तीन अब्ज ‘क्वेसार’ सापडले आहेत. फोटोमेट्रिक कॅटलॉगमध्ये त्यांची नोंद असून आपल्या पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेला ‘किंतारा’ (क्वेसार) 600 दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावर आहे. दूरच्या क्वेसारची नोंद, त्यापेक्षा लांब असलेला क्वेसार सापडला की बदलते. विश्वनिर्मितीनंतर फक्त दशलक्ष वर्षांनी किंवा त्यापूर्वीही निर्माण झालेले ‘क्वेसार’ संशोधकांनी नोंदले आहेत. 2015 मध्ये सर्वात दूरचा क्वेसार शोधला गेला.

हे किंतारे जन्माला आले तेव्हापासून 10 दशलक्ष वर्षांपर्यंत खूप क्रियाशील (ऑक्टिव्ह) होते. विश्वात काही ठिकाणी क्वेसारचे समूहसुद्धा आढळले आहेत. 1964 च्या मे महिन्यात हॉन्ग यी चियू यानी अशा ताऱ्यांसारख्या अवकाशीय वस्तूंचा ‘क्वेसार’ किंवा ‘किंतारे’ म्हणून एका वैज्ञानिक लेखात पहिल्यांदा उल्लेख केला. मग तेच नाव त्यांना मिळाले. सुरुवातीला त्याना ‘क्वासी स्टेलर रेडिओ सोर्स’ म्हटले जायचे. ‘क्वेसार’चे संशोधनन 1950 मध्ये ‘रेडिओ- अ‍ॅस्ट्रॉनॉमी’च्या उदयानंतरच होऊ लागले. कृष्णविवरातील आणि दीर्घिकेच्या गाभ्यातील द्रव्याचे अँक्रिशन किंवा कमी-अधिक झाल्यामुळे जन्म घेतात, असे 1964 मध्ये एडविन आणि याकोव या संशोधकांनी म्हटले. विश्वनिर्मितीच्या आरंभी त्यांचे प्रमाण जास्त होते असेही लक्षात आले आहे. विश्वातील अशी रहस्ये आपल्या चकित करतात आणि अधिक अभ्यासाला प्रवृत्तही करतात.