केंद्रीय अर्थसंकल्पावर नाराज असलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी ट्विट केले आहे. ‘आता आम्ही देशाचा विचार करतोय, असे तुम्ही म्हणाले होते. पण मंगळवारी सादर झालेला अर्थसंकल्प हा तुमचे सरकार वाचवेल, पण हिंदुस्थान नाही’, अशी सडकून टीका मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी केली.
‘सर्वसमावेश असे सरकार चालवा आणि ज्यांनी तुमचा पराभव केला आहे त्यांचा सुड घेण्यासाठी तुम्ही उतावीळ होऊ नका. आपल्या राजकीय आवडी-निवडीवर सरकार चालवाल तर तुम्ही एकटे पडाल’, असा सल्ला वजा इशारा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी दिला. संसदेच्या आवारात मोदी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या खासदारांचा व्हिडिओही मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी या पोस्टमध्ये शेअर केला. या व्हिडिओत वेगवेगळे फलक घेऊन खासदार घोषणा देत आहेत. ‘देशाला इंडियाचा बजेट हवा आहे, एनडीएचा नाही’ असे एका फलकावर लिहिले आहे.
डीएमके खासदार दयानिधी मारन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी एम. के. स्टॅलीन यांचा सल्ला घेऊन त्याचे अनुकरण केले पाहिजे. कारण ज्या मतदारांनी आम्हाला मत दिले नाही त्यांच्यासाठीही आम्ही काम करतोय, असा टोला दयानिधी मारन यांनी लगावला.
नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार
केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी मंगळवारी तिखट प्रतिक्रिया दिली. ‘अर्थसंकल्पात राज्याला दुर्लक्षित केले. यामुळे त्याचा निषेध करतो’, असे मुख्यमंत्री स्टॅलीन म्हणाले होते. ‘तसेच येत्या शनिवारी 27 जुलैला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीवर आमचा बहिष्कार असेल. कारण केंद्राचा अर्थसंकल्प हा निराशाजनक आहे. आणि या अर्थसंकल्पात तामिळनाडूला पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले. त्यामुळे नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घालणेच योग्य ठरेल’, असे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन म्हणाले होते.