बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव आज भरून ओसंडून वाहू लागला. आज दुपारी 4 वाजून 16 मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
यापूर्वी दिनांक 20 जुलै 2024 रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. तर आज त्यापाठोपाठ तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी आतापर्यंत 2 तलाव पूर्ण भरून वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून आज सकाळी 6 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या 58.58 टक्के इतका जलसाठा आहे.
आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही 14,508 कोटी लीटर (145,080 दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव गतवर्षी दिनांक 26 जुलै 2023 रोजी पहाटे 4.35 वाजता, तर वर्ष 2022 मध्ये दिनांक 14 जुलै रोजी रात्री 8.50 वाजता आणि सन 2021 मध्ये दिनांक 22 जुलै रोजी पहाटे 05.48 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7.05 वाजता पूर्ण भरून वाहू लागला होता.