अहमदनगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे.
नगर जिल्हा पोलिसांच्या भ्रष्ट आणि अनियंत्रीत प्रशासनासंदर्भात दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दि. 11 जुलै रोजी पत्राद्वारे केली होती. मात्र त्यांच्याकडून काहीही कार्यवाही न झाल्याने आपण दि. 22 जुलैपासून नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असतानाही राज्य शासन अथवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
उपोषण आंदोलनादरम्यान जिल्ह्याच्या विविध भागांतून सामान्य नागरीकांकडून असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागरीकांकडून करण्यात आलेल्या तक्रारी अतिशय गंभीर आणि नगर जिल्हा पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या आहेत. नगर जिल्हा पोलीस दलातील भ्रष्ट आणि अनियंत्रीत प्रशासनाच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी तसेच संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात याव्यात, अशी मागणी खासदार लंके यांनी या पत्रातून केली आहे.