रेल्वेमंत्र्यांना निवडणुकांसाठी वेळ, पण मुंबईतील चाकरमान्यांचे हाल दिसेना; आदित्य ठाकरे यांचा संताप

मध्य रेल्वेवर गेल्या काही दिवसांपासून रोज कुठे ना कुठे बिघाड होऊन मुंबईतील उपनगरी लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत होत आहे. ऐन पावसात आणि कामावर जाण्याच्या वेळेतच या घटना होत असल्याने चाकरमान्यांच्या मानस्ताप होत आहे. आजही मुंबईत मध्य रेल्वेवर माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे मुंबईकर चाकरमान्यांना रेल्वे रूळावर चालत जाऊन पुढे कामावर जावे लागले. यावरून आता शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. शीव आणि मांटुगा रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी लोकलमधून खाली उतरून रेल्वे रूळावरून चालत निघाल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे. आजच्या घटनेचा हा व्हिडिओ आहे. यासोबत आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये रेल्वेमंत्र्यांनाही फैलावर घेतले आहे. निवडणुकांसाठी भाजपचे प्रभारी म्हणून रेल्वेमंत्री कित्येकदा महाराष्ट्रात आणि मुंबईत येऊन जातात. रेल्वेवर रोज घटना घडत आहे. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांसाठी रील सुरूच आहेत, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईत माटुंगाजवळ झालेल्या घटनेनंतर मध्य रेल्वेवरील वाहतूक दुपारपर्यंत पूर्वपदावर आलेली नव्हती. मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते 15 मिनिटं किंवा त्याहून अधिक काळ उशिराने सुरू असल्याची उद्घोषणा केली जात होती. तसेच हार्बर मार्गावरील वाहतूकही जवळपास 10 मिनिटं उशिराने सुरू असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगितले जात होते.