उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अडकवा; अनिल देशमुखांना होती भाजपची ऑफर! श्याम मानव यांच्या दाव्यानं खळबळ

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी मिंधे-भाजपने केलेले काळे कारनामे जगजाहीर असतानाच आता आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आणि तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह तत्कालीन व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठी ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर नाकारात अनिल देशमुख यांनी तुरुंगवास स्वीकारला, असा दावा अखिल भारतीय अधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना श्याम मानव म्हणाले की, महाराष्ट्रातील एका भाजप नेत्याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार प्रतिज्ञापत्र पाठवली होती. या प्रतिज्ञापत्रांवर सही केली तर तुम्हाला ईडी प्रकरणात तुरुंगवास होणार नाही, अशी ऑफर देशमुख यांना देण्यात आली होती. यामुळे अनिल देशमुख प्रचंड दबावात आले होते आणि त्यांच्या मनात आत्महत्येचेही विचार घोळत होते. मात्र सुदैवाने त्यांनी तसे कोणतेही पाऊल उचलले नाही. निरपराध लोकांना अडकवण्यापेक्षा त्यांनी तुरुंगवास स्वीकारला. त्यानंतर त्यांनाही क्लीन चिट मिळाली.

काय होतं त्या प्रतिज्ञापत्रात?

श्याम मानव यांनी भाजप नेत्याने अनिल देशमुख यांना पाठलेल्या प्रतिज्ञापत्राबाबतही माहिती दिली. ‘पहिल्या प्रतिज्ञापत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी मला मातोश्री निवासस्थानी बोलावून दर महिन्याला पैसे गोळा करण्यास सांगितले’, असे नमूद केलेले होते. ‘दुसऱ्या प्रतिज्ञापत्रामध्ये आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन नावाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला’, असे लिहिलेले होते. ‘तिसऱ्या प्रतिज्ञापत्रामध्ये अनिल परब यांची बांधकामं अवैध आहेत’, असे नमूद होते, तर ‘चौथ्या प्रतिज्ञापत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला बंगल्यावर बोलावले. त्यावेळी त्यांचे चिरंजीव पार्थ पवारही तिथे हजर होते. त्या दोघांच्या उपस्थितीत मला गुटखा विक्रेत्यांकडून पैसे गोळा करून आणून द्या’, असे नमूद होते. या चारही प्रतिज्ञापत्रांवर सही केली तर तुमच्यावर ईडी कारवाई होणार नाही, अशी ऑफर अनिल देशमुख यांना होती.

अनिल देशमुख यांनी मला हे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा निरोप आला की अजित दादांविरोधात बोलणे शक्य नसेल तर बाकी तीन प्रतिज्ञापत्रावर सही करून द्या. अनिल देशमुख यांच्यावर त्यावेळी प्रचंड दबाव होता. त्यांच्या राजकीय करियरचा, कुटुंबाचा प्रश्न होता. त्यांनी खूप विचार केला. माझ्यामुळे तीन निरपराध लोकं तुरुंगात जातील. हे मला मान्य नाही. ते आत्महत्या करण्याच्या स्टेजपर्यंत पोहोचले होते. परंतु सुदैवाने त्यांनी तसे काही केले नाही आणि प्रतिज्ञापत्रावरही सही केली नाही.

देशमुख यांनी सही न केल्याने पुढची सगळी चौकशी सुरू झाली आणि त्यांना 13 महिने तुरुंगात काढावी लागली. आजही ती प्रतिज्ञापत्र देशमुख यांच्याकडे सुरक्षित आहेत, असा दावा श्याम मानव यांनी केला. श्याम मानव यांच्या या दाव्याला देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझ्याकडे एक माणूस पाठवून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवारांवर आरोप करा असे सांगितले होते, असा गौप्यस्फोट देशमुख यांना केला.