Budget 2024: ‘भेदभावपूर्ण’ अर्थसंकल्प म्हणत INDIA आघाडीची संसदेत निदर्शनं

2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष INDIA आघाडीच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली, अनेक पक्षांनी याला गैर-भाजप-शासित राज्यांविरुद्ध ‘भेदभावपूर्ण’ अर्थसंकल्प असं म्हटलं आहे.

निदर्शनास उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा समावेश आहे.

अखिलेश यादव यांनी बुधवारी अर्थसंकल्पातील घोषणांवरून मोदी सरकारवर नवा हल्ला चढवला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्यात केंद्र अपयशी ठरले आहे. ते म्हणाले की, सरकार आधी लोकांना बेरोजगार करते आणि नंतर एक महिन्याची इंटर्नशिप देते जी काम करत नाही’. भाजीपाल्याची महागाई वाढल्याने त्यांनी सरकारवर टीका केली.

यादव यांनी असा दावा केला की मोदी सरकार राज्याप्रती भेदभावपूर्ण धोरणे अवलंबत आहे आणि त्याऐवजी बिहार आणि आंध्र प्रदेशमधील आपल्या मित्रपक्षांना दिलासा देत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या 10 राजाजी मार्गावरील निवासस्थानी INDIA आघाडीच्या पक्षांचे नेते एकत्र आल्याच्या एका दिवसानंतर बुधवारी ही निदर्शने करण्यात आली.

खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत, द्रमुकचे खासदार टीआर बाळू आणि तिरुची शिवा, झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार महुआ माजी, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा असे नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केसी वेणुगोपाल म्हणाले, ‘यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाने अर्थसंकल्पाची संकल्पना आधीच नष्ट केली आहे. त्यांनी बहुतांश राज्यांशी पूर्णपणे भेदभाव केला आहे.’ असं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.