सैनिकहो तुमच्यासाठी… कारगील युद्धातील शहिदांच्या कुटुंबीयांचा सत्कार

कारगिल युद्धामध्ये हिंदुस्थानी जवानांनी जे अतुलनीय शौर्य दाखवले होते, त्या शौर्यासाठी 26 जुलै हा दिवस आपल्या देशात विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या रौप्य महोत्सवी विजय दिनानिमित्त जयहिंद जनजागृती प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार, 26 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य शौर्यवंदन यात्रा, मृदा कलश पूजन, शिष्यवृत्ती वितरण आणि शौर्य-गौरव पुरस्कार सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हा सोहळा स्वामीनारायण मंदिर सभागृह, योगी नगर, बोरिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे.

जयहिंद जनजागृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, उपप्राचार्य महेश औटी, लायन्स क्लब सफाळेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, नायक विजय कातोरे, वीरमाता ज्योती राणे यांच्यासह कारगिल
योद्धे कर्नल चंद्रशेखर उन्नी, कॅप्टन प्रदीप पटनायक, कीर्ती चक्र विजेते सुभेदार संतोष राळे, शौर्य चक्र विजेते पॅरा कमांडो मधुसुदन सुर्वे उपस्थित राहणार आहेत. शौर्य वंदन शोभा यात्रेने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. स्वामीनारायण मंदिर येथे कारगिल युद्धातील शहिदांच्या पवित्र भूमीतून आणलेल्या मृदा कलशाचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर वासुदेव राऊत यांच्या स्मरणार्थ 10 आदिवासी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाईल. शेवटी युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांना शौर्य-गौरव पुरस्कार वितरण केले जाईल. या वेळेस कारगिल युद्धामध्ये सहभागी असलेले कॅप्टन प्रदीप पटनायक कारगिल युद्धातील अनुभव सांगतील.