अजित पवार को गुस्सा क्यों आता है… पैसे कुठून आणू? जमिनी विकायच्या काय? मंत्रिमंडळ बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महायुतीच्या मंत्र्यांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. मंत्री गिरीश महाजन यांनी निधीची मागणी करताच ‘पैसे कुठून आणू, जमिनी विकायच्या काय’ असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री यांनी केला. त्यावर ‘नको तिथे खर्च नको सांगता मग इथे खर्च कशाला’ अशा शब्दांत महाजन यांनी उत्तर देताच मंत्रिमंडळातील सदस्यही अवाक् झाल्याचे सांगण्यात येते.

राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये निधीवाटपावरून आधीच असंतोष आहे. वित्त मंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांना निधीवाटपात झुकते माप मिळत असल्याची तक्रार शिंदे समर्थक आमदारांनी यापूर्वी केलीच आहे. आता त्यात भाजप आमदारांचीही भर पडली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत या निधीवाटपाच्या मुद्दय़ावरून असंतोषाचा विस्फोट झाला.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. आता विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची या सरकारमधील मंत्र्यांना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी पदरात पाडून घेण्याचा महायुतीतील आमदारांचा आणि मंत्र्यांचाही प्रयत्न आहे. पण त्यातून वादाच्या ठिणग्या पडू लागल्याचे प्रत्यंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आले.

बैठकीत नेमके काय घडले

गिरीश महाजन यांनी त्यांच्या अखत्यारीतील ग्रामविकास विभागाला ग्रामीण भागातील रस्त्यांच्या योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर अजित पवार संतप्त झाले आणि पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का, असा संतप्त सवाल गिरीश महाजन यांनी केला.

त्यावर गिरीश महाजन यांनी एका क्षणाचा विलंब न लावता अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांच्या गटातील  एका आमदाराच्या सिन्नर मतदारसंघातील स्मारकासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनीच मंत्रिमंडळात मांडला होता. त्याची आठवण गिरीश महाजन यांनी या वेळी करून दिली आणि नको तिथे खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथे खर्च कशाला? असा सवाल महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्र कर्जाच्या बोज्याखाली

राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला आहे. त्यात सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. या योजनांसाठी सरकारला कर्ज काढावे लागणार आहे. त्यामुळे अर्थ खाते दडपणाखाली आहे. त्यातच निधीची मागणी झाल्याने अजित पवार यांचा संताप अनावर झाल्याची चर्चा आहे.