अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याप्रकरणी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली. सुमित सिंग असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार महिला या गोरेगाव येथे राहतात. त्याचा एक सोळा वर्षांचा मुलगा आहे. तो एडीएचडी आजाराने त्रस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या स्वभावात बदल झाला होता. तो फारसा कोणाशी बोलत नव्हता. तो विचित्र वागत असल्याने त्याच्या आईने विचारपूस केली तेव्हा त्याने घडल्या प्रकाराची माहिती त्याच्या आईला दिली. दोन महिन्यांपूर्वी त्याला एका नंबरवरून मेसेज आला. मेसेज आल्यावर त्या रात्री मुलीचा त्याला व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉल आल्यानंतर तिने मुलाला नकोसे कृत्य करण्यास भाग पाडले. त्याचा अश्लील व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ तयार करून मुलाला धमकावण्यास सुरुवात केली. जर पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगा घाबरला.
पैसे देऊन हे प्रकरण मिटवून टाकू असे सांगितले. भीतीपोटी त्याने पैसे दिले. पैसे दिल्यानंतर व्हिडीओ व्हायरलची धमकी त्याला दिली जात होती. त्यामुळे तो घाबरला. पैशासाठी तो त्याच्या आजीच्या घरी आला. आजीचे दागिने आणि काही पैसे त्याने चोरून सुमितला दिले. त्यानंतरदेखील त्याच्याकडे आणखी पैशाची मागणी होऊ लागली. घडल्याप्रकरणी मुलाच्या आईने वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक रामप्यारे राजभर यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी सुमितला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने ते पैसे कोणाला दिले, त्या पैशातून त्याने काय केले याचा तपास सुरू आहे.