पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून तरुणाने अन्य पाच जणांना हाताशी घेऊन एका तरुणाला भररस्त्यात मारहाण केली. इतक्यावरच न थांबता आरोपीने त्याला गाडीत जबरदस्ती कोंबून त्यांचे अपहरण केले, पण हा प्रकार कळताच पोलिसांनी तत्काळ तपास करत 12 तासांच्या आत अपहरण झालेल्या तरुणांची सुटका केली. तसेच तिघा आरोपींना अटक केली.
हेमंतकुमार रावल (30) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. हेमंत आणि जतीन (नाव बदललेले) हे एकत्र शेअर मार्केटशी संबंधित काम करायचे. हेमंतकुमारने काही रक्कम जतीनकडून घेतली होती, पण ती परत करण्यात हेमंतकडून चालढकलपणा होत असल्याने जतीनची सटकली. जतीनने त्याला अद्दल घडविण्याचे ठरवून काही तरुणांना हाताशी घेतले. मग ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारी हेमंतला चिराबाजार परिसरात गाठून जतीन व त्याच्यासोबत असणाऱयांनी त्याला मारहाण केली. मग हेमंतला गाडीत घेऊन तेथून पळ काढला. त्यावेळी हेमंतसोबत असलेल्या त्याच्या मित्राने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. एल. टी. मार्ग पोलिसांना याबाबत अवगत केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ व निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल भंडारे, विकास पाटील, उपनिरीक्षक प्रशांत कांबळे, गायकवाड, वायाळ व पथकाने तपास सुरू केला. पथकांनी तांत्रिक बाबींच्या आधारे गाडीचा माग काढत पुण्यातील कोंढवापर्यंत धडक दिली. अखेर कोंढवा परिसरातून हेमंतची सुटका करून पोलिसांनी तिघा आरोपींना पकडले. अन्य तीन आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.