मुसळधार पाऊस होऊनही राज्यातील हजारो गावे, वाड्यावस्त्या तहानलेल्या; 2000 वाडीवस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा

राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊनही हजारो गावे आणि वाडय़ावस्त्यांना अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एक हजारांवर गावे आणि दोन हजारांवर वाडय़ांना अजूनही टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागत आहे. टँकर्सच्या संख्येतही 326 ने वाढ झाली आहे.

कृषी विभागाने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पाऊस परिस्थितीबाबत सादरीकरण केले. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. राज्यात सरासरीच्या 123.2 टक्के पाऊस झाला असून पेरण्यादेखील समाधानकारक झाल्या आहेत, असा दावा यावेळी कृषी विभागाने केला.

राज्यात 22 जुलैपर्यंत 545 मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास 422 मि.मी. म्हणजेच सरासरीच्या 95.4 टक्के पाऊस झाला होता. राज्यात खरिपाचे ऊस वगळून 142.2 लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 91 टक्के म्हणजेच 128.94 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भात व नाचणी पिकाची पुनर्लागवड कामे सुरू असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, उडिद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता आहे, अशी आकडेवारी कृषी विभागाकडून देण्यात आली.

सर्व धरणांमध्ये 39.17 टक्के पाणीसाठा

सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये 39.17 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 43.65 टक्के पाणीसाठा होता. सर्वात कमी म्हणजे 12.13 टक्के पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच 28.34 टक्के नाशिक येथे आहे, अशी माहिती कृषी अधिकाऱयांनी दिली.