धारावीचा पुनर्विकासासंदर्भात तोडगा निघत नाही आणि धारावीकरांना सरसकट सर्वांना 500 चौरस फुटांची घरे सरकार देत नाही तोपर्यंत सर्वेक्षणाला विरोध असतानाही आज पुन्हा अदानीच्या डीआरपीपीएल कंपनीच्या कर्मचाऱयांनी पावसाचा आधार घेत धारावीत आज सकाळी पुन्हा घुसखोरी केली. धारावीतील ट्रान्झिट कॅम्प आणि धोबी घाट येथे सर्वेक्षण सुरू करण्याचे काम केले. मात्र धारावी बचाव आंदोलनातील सर्वपक्षीय सदस्यांना याची माहिती मिळताच त्यांनी धाव घेत हे सर्वेक्षण बंद पाडले तर सक्तीने केलेल्या सर्वेक्षण क्रमांकांना धारावीकरांनी काळे फासले.
केंद्रातील मोदी सरकार आणि मिंधे सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प एकहाती अदानीच्या घशात घातल्यानंतर अदानीच्या डीआरपीपीएल कंपनीच्या कर्मचाऱयांनी गेल्या महिन्याच्या 11 तारखेला धारावीतील नाईकनगर झोपडपट्टीत सर्वेक्षणासाठी घुसखोरी केली होती, मात्र त्यावेळी डीआरपीपीएल कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांना धारावीकरांनी हुसकावून लावले. आजही घुसखोरी करणाऱया डीआरपीपीएलच्या कर्मचा-यांची घुसखोरी रोखून त्यांना माघारी जायला भाग पाडले. यावेळी आपचे ऍड. संदीप कटके, ऍड. राजेंद्र कोरडे यांच्यासह धारावी बचाव आंदोलनातील सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते.
अदानीचा सरकारी अधिकाऱयांवर दबाव
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवासन यांनी 11 जूनला धारावीकरांनी सर्वेक्षण बंद पाडल्यानंतर या पुढे सर्वेक्षण होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन धारावीकरांना दिले होते, मात्र अदानीच्या दबावामुळेच डीआरपीपीएल कंपनीच्या कर्मचाऱयांनी आज पुन्हा सर्वेक्षणाचा विफल प्रयत्न केला. अदानी आणि अदानीची कंपनी सरकारी अधिकाऱयांनाही जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट होते, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी केला आहे.