गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत पुढील आठवडय़ात सुनावणी; शिवसेना, राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल

शिवसेनेतून गद्दारी केलेल्या मिंधे गटासह अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवडय़ात सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकांची न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. याबाबत लवकरच सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने नमूद केले.

गद्दार आमदारांना अपात्र न ठरवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेनेतर्फे पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जयंत पाटील यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या याचिका मंगळवारी सुनावणीसाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सूचीबद्ध करण्यात आल्या होत्या. तथापि, ‘नीट-यूजी’ परीक्षेच्या प्रकरणामुळे गद्दार आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी होऊ शकली नाही. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीच्या वकिलांनी याचिकांवर पुढील तारीख निश्चित करण्यासाठी खंडपीठाला विनंती केली. त्यांच्या विनंतीची गंभीर दखल घेत खंडपीठाने लवकर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार पुढील आठवडय़ात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष

राज्यातील विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याचदरम्यान सर्वोच्च न्यायालय राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात सुनावणीला तयार झाले आहे. किंबहुना न्यायालयाने नार्वेकर यांना या प्रकरणातील मूळ कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गद्दार आमदारांचे धाबे दणाणले असून त्यांचे काय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.