बजेटवर घाव; विरोधकांची टीका

कॉपीकॅट बजेट -खरगे

एनडीए सरकारचे बजेट कॉपीकॅट बजेट असून काँग्रेसच्या न्याय अजेंडय़ाची त्यांना नीट कॉपीही करता आलेली नाही, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधला. एनडीए सरकारचे बजेट म्हणजे अर्ध्या भाजलेल्या रेवडय़ा वितरित करणे आहे, जेणेकरून एनडीए टिकेल. हे देशाच्या प्रगतीचे बजेट नसून एनडीए सरकार वाचवणारे बजेट आहे. 10 वर्षांनंतर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचा प्रश्न भेडसावणाऱ्या तरुणांसाठी मर्यादित घोषणा करण्यात आल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

तिन्ही कर्णधार केंद्रानेच केले शून्यावर बाद – अंबादास दानवे

अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला देशाचे पॉवर हाउस म्हणून संबोधणाऱ्या पंतप्रधानांनी राज्यात त्यांचे सरकार असताना सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर तुरी दिल्या आहेत. महाराष्ट्राप्रति पंतप्रधानांचे प्रेम हे बेगडी असल्याचे दिसून आले आहे, अशा कठोर शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर परखड टीका केली. राज्यातील राज्यकर्त्या पक्षांचे तिन्ही कर्णधार आज त्यांच्याच लोकांनी शून्यावर बाद केलेले दिसले, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

महायुतीचे नेते आता मूग गिळून गप्प का – सुनील प्रभू

महाराष्ट्रातून मुंबई देशाच्या आर्थिक विकासासाठी सर्वाधिक कर देते. मात्र, अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा वाटेला फक्त निराशाच येते. भाजपच्या राजवटीत दिल्लीश्वर काही देतील का अशी आश्रित म्हणून वाट पाहावी लागतेय. अर्थसंकल्पात सर्वात कमी कर देणाऱ्या बिहार आणि आंध्र प्रदेशला झुकते माप देण्यात आले आहे तर सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या तोंडाला मात्र पाने पुसण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडणारे महायुतीचे नेते आता गेले कुठे, ते नेते मूग गिळून गप्प का बसले आहेत, अशी टीका शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी केली.

महाराष्ट्राला काय मिळाले रामाला माहीत – राजन विचारे

महाराष्ट्राला या बजेटमध्ये काय मिळाले हे प्रभू श्रीरामाला माहीत. उत्तर प्रदेश, बिहारला कितीतरी निधी दिला. मग महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केलेय. देशाला सगळ्यात जास्त कर मुंबई आणि याच महाराष्ट्रातून जातो. तरीही राज्याला काय दिले? खोटय़ा हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेल्या मिंधे सरकारने बघावे. काय फायदा झाला या महाराष्ट्राचा? अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी दिली.

सामान्य जनतेकडे दुर्लक्षच – अमित देशमुख

वाढती महागाई, बेरोजगारीच्या संदर्भाने ठोस उपाययोजना करून केंद्रसरकार सामान्य जनतेला दिलासा देईल, ही अपेक्षा होती. मात्र आज सादर झालेल्या अर्थसंकल्पातून ती फोल ठरली आहे. कर रुपाने सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्राच्या पदरीही पुन्हा एकदा निराशाच आली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

साखरेच्या पाकात बुडविलेले गाजर – ओमराजे निंबाळकर

या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांमधील असंतोष अजून वाढेल हे दिसत आहे.  शेतीबाबत मोठा कळवळा असल्याचे दाखवणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्याला साखरेच्या पाकात बुडवलेले गाजरच दिले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.