![indian army](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/indian-army-1-1-696x447.jpg)
जम्मू-कश्मीरमधील पूंछमधील एलओसी जवळील बटाल सेक्टरमध्ये मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती, हा प्रयत्न हिंदुस्थानी जवानांनी हाणून पाडला. पूंछच्या कृष्णा घाटी पट्टय़ातून काही दहशतवादी बटालमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र लष्कराच्या जवानांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली. लष्कराने तत्काळ कारवाई करून त्यांना रोखले. दरम्यान गोळीबारात दहशतवाद्यांचेही नुकसान झाले. मात्र, दहशतवादी जखमी किंवा ठार झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. जम्मूमध्ये 24 तासांतील हा दुसरा हल्ला आहे. याआधी सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास शौर्य चक्र विजेते परशोत्तम कुमार यांच्या राजौरीतील घोंडा येथील घरावर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला होता. प्रत्युत्तरादाखल लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले. या हल्ल्यात एक जवान आणि परशोत्तमचे काका जखमी झाले. येथे आज दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू आहे.