अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर 24 तासांच्या आत कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी बहुमत मिळवले आहे. कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आतापर्यंत 4 हजारपैकी 1976 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कमला हॅरिस यांनी प्रथमच अमेरिकन जनतेला संबोधित केले. 1 ते 7 ऑगस्टदरम्यान, डेमोक्रॅट्स नामांकनासाठी मतदानाची पहिली फेरी होईल. बायडेन यांनी अवघ्या चार वर्षांत इतके काम केले आहे की अनेक राष्ट्राध्यक्ष दोन टर्ममध्ये पूर्ण करू शकले नाहीत, अशा शब्दांत उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्याचे कौतुक केले. पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकन खेळाडूंच्या सत्कार समारंभात कमला हॅरिस यांचे आगमन झाले. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने जो बायडेन या वेळी उपस्थित नव्हते.
हिलरी क्लिंटनचा हॅरिस यांना पाठिंबा
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्षपदासाठी हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. हॅरिस यांना पाठिंबा द्या असे आवाहन क्लिंटन यांनी केले.