सुप्रीम कोर्टात आज NEET UG 2024 परीक्षेच्या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने NEET UG 2024 फेरपरीक्षा घेण्यास स्पष्ट नकार देत मोठा निकाल दिला. संपूर्ण परीक्षेवर विपरीत परिणाम झाल्याचे पुरावे नाहीत. तसेच या प्रकरणी तपास अपूर्ण आहे. 4750 केंद्रांपैकी कुठल्या केंद्रांवर परीक्षेत घोळ झाला? याची माहिती आम्ही केंद्र सरकारकडे मागितल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकाल देताना सांगितले. फेरपरीक्षा घेतल्यास देशातील 20 लाख विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होईल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. या सुनावणी दरम्यान काही विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे अॅडव्होकेट मॅथ्यू नेदुमपरा यांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भर कोर्टात झापले आणि कारवाई करण्याची तंबी दिली.
सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले
नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सुनावणीदरम्यान वकील हुडा युक्तीवाद करत होते. पण मध्येच अॅडव्होकेट मॅथ्यू नेदुमपरा हे बोलण्यासाठी उठले. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना बऱ्याचदा खाली बसण्याची विनंती आणि सूचना केली. पण अॅडव्होकेट मॅथ्यू हे ऐकतच नव्हते. अनेकदा समजावूनही मॅथ्यू ऐकत नसल्याने सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले.
’24 वर्षांपासून मी न्यायव्यवस्थेत…’
तुम्ही खाली बसा अन्यथा तुम्हाला कोर्टाच्या बाहेर काढेन. कृपया खाली बसा, ही तुम्हाला वॉर्निंग आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. त्यानंतरही मॅथ्यू खाली बसण्यास तयार नव्हते. अॅडव्होकेट हुडा यांचा युक्तीवाद पूर्ण होऊ द्या. मग तुम्ही बोला, असे सरन्यायाधीश म्हणाले. तसेच तुम्ही सुनावणीत हस्तक्षेप करत आहात, असेही सरन्यायाधीशांनी मॅथ्यू यांना सुनावले. त्यानंतरही मॅथ्यू उभं राहून बोलत राहिले. मी कोर्टातून निघून जातो, असे मॅथ्यू म्हणाले. पण तरीही ते कोर्टात उभं राहून बोलत राहिले. मला बोलू द्या, असे मॅथ्यू म्हणत होते. मॅथ्यू ऐकत नसल्याचे पाहून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी थेट सुरक्षारक्षकांना बोलावण्याची सूचना केली. त्यानंतरही मॅथ्यू बोलत राहिले. मी कोर्टाचा इन्चार्ज आहे, तुम्ही माझं ऐका आणि शांत बसा, असे म्हणत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी खडसावले.
अनेकदा सांगून आणि सूचना करूनही मॅथ्यू ऐकत नसल्याने सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले. अनपेक्षित अशी मोठी कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे सरन्यायाधीशांनी बजावले. तुम्हाला जायचं असेल तर जा. थांबायचं असेल तर गप्प बसा, असे सरन्यायाधीश बोलले. त्यानंतरही मॅथ्यू युक्तीवाद करण्याची मागणी करत होते. हुडा यांचा युक्तीवाद झाल्यानंतर मी तुम्हाला बोलण्याची संधी देईन. मी या सुनावणी प्रक्रियेचा इन्चार्ज आहे. गेल्या 24 वर्षांपासून न्यायव्यवस्था बघत आलोय. कोर्ट कसं चालवायचं हे कुठल्याही वकीलाने मला शिकवू नये, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावले. तरीही मॅथ्यू यांनी ऐकले नाही. मीही 1979 पासून न्यायव्यवस्थेत काम करतोय, असे मॅथ्यू म्हणाले. पण त्यांच्या बोलण्याकडे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दुर्लक्ष करत सुनावणी सुरू केली.