
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प राजकीय असून गरीब आणि जनताविरोधी असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालला सापत्न वागणूक दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालचा द्वेश करतात, अशी खरमरीत ममता बॅनर्जी यांनी केली.
कोणाला भीक नको आहे, पश्चिम बंगालची जनता याचे उत्तर देईल. अर्थसंकल्पात सामान्य माणूस आणि गरीबांसाठी काही नाही आहे. बंगालसोबत पुन्हा एकदा दुजाभाव केला आहे. बंगालची केंद्रावर 1.71 लाख कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. मात्र आमच्या राज्याला अर्थसंकल्पात एक रुपयाही दिला नाही, असा संताप ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष प्राधान्य दिले, याला आमची काही हरकत नाही. मात्र यात बंगालसह अन्य राज्यांसोबत दुजाभाव केला आहे. हा संपूर्णपणे राजकीय अर्थसंकल्प आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालचा द्वेष करतात हे स्पष्ट होते, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.