हदगाव येथील पोलीस पाटलाने व्हिडीओ रेकॉर्ड करत आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार या प्रकरणी हदगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.22 जुलै रोजी सायंकाळी हदगाव तालुक्यातील पेवा गावचे पोलीस पाटील बाळासाहेब जाधव (50) यांनी ग्राम पंचायत कार्यालयात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यापूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ बनवला आणि हदगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर हे अत्यंत त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच माझा कुठलाही संबंध नसताना मला गोवण्याचा व मानसिक त्रास देण्याचा खुप प्रयत्न केला. या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचा मुलगा अनिकेत बाळासाहेब जाधव याने हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ”माझे वडील पेवा गावचे पोलीस पाटील या पदावर मागील 20 वर्षापासून काम करीत आहेत. मागील आठवड्यापासून ते तणावात असल्याचे पाहून मी आणि माझ्या आईने त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी एका खुनाच्या प्रकरणात हदगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर हे मला मानसिक त्रास देत आहेत आणि धमक्या देत आहेत असे आम्हाला सांगितले होते, अशी माहिती अनिकेतने पोलिसांनादिली होती.
22 जुलै रोजी बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात जाऊन येतो असे सांगून सकाळी 9 वाजता घरातून निघाले. त्यानंतर 11 च्या सुमारास जाधव यांच्या पत्नीला त्यांनी ग्राम पंचायत कार्यालयात आत्महत्या केल्याचे कळविण्यात आले. गावातील नागरिक व ग्रामपंचायत कार्यालय येथील लोकांनी जाधव यांना खाजगी वाहनाने दवाखान्यात नेले पण त्यांचा मृत्यू झालेला होता. बाळासाहेब जाधव यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मोबाईल तपासला असता त्यात एक व्हिडीओ होता. त्या व्हिडीओत मी पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे बाळासाहेबांनी म्हटलेले आहे.
यानंतर पेवा येथील नागरिकांनी पार्थिव शरीर घेण्यास नकार देत संबंधिताविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी याबाबतची सखोल माहिती घेऊन मुलाच्या तक्रारीवरुन हदगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार पोलीस निरीक्षक भडीकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.