राहुरी दुहेरी हत्याकांड; तीन आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी

राहुरीतील दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे. आरोपी क्रमांक 4 हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्याने न्यायालयाने त्यास राहुरी सबजेल येथेच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राहुरी येथील ऍड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ऍड. मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचे 25 जानेवारी 2024 रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता.

या घटनेतील आरोपी किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा), शुभम संजित महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनील मोरे (रा. उंबरे) या पाच आरोपींना पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन गजाआड केले होते.

आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजित महाडिक, बबन सुनील मोरे यांना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रयत्नाने न्यायालयाने जिह्याबाहेर वर्ग करण्याच्या राहुरी पोलीस व जेल अधीक्षक राहुरी यांनी केलेल्या विनंतीनुसार परवानगी दिल्याने चौघांना नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे हलविण्यात आले आहे.