![merit list](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/06/merit-list-696x447.jpg)
अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी म्हणजेच शेवटची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली असून या यादीत दुसऱया यादीच्या तुलनेत विक्रमी 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईतील अनेक नामवंत कॉलेजचा तिसऱ्या यादीचा कटऑफ वाढलेला दिसला. नियमित प्रवेशाची ही शेवटची यादी असूनही ऑनलाईन अर्ज केलेल्या 1 लाख 834 विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळालेला नाही.
तिसऱया गुणवत्ता यादीसाठी एकूण 1 लाख 70 हजार 860 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी एकूण 1 लाख 53 हजार 888 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ 53 हजार 54 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. या कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 24 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर सुमारे लाखभर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. आता या विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत उपलब्ध राहिलेल्या जागानुसार प्रवेश घ्यावा लागणार आहे. 24 जुलै रोजी रात्री तिसऱ्या यादीनुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर जाहीर होणार असून त्यानंतर पुढील प्रवेश फेरीसाठी किती जागा रिक्त आहेत हे स्पष्ट होणार आहे.
n तिसऱया यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 812 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, तर 8433 जणांना दुसऱया आणि 7033 विद्यार्थ्याना तिसऱया पसंतीचे कॉलेज अलॉट झाले आहे.
n ज्या विद्यार्थ्यांना तिसऱया गुणवत्ता यादीत कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांनी दहावीतील गुण व संबंधित कॉलेजचा कटऑफ याचा विचार करून पहिल्या विशेष फेरीमध्ये आपल्या प्रवेश अर्जाच्या भाग 2 मध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कॉलेज पसंतीक्रम भरून प्रवेश अर्ज 2 लॉक करावा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
सर्वच शाखांच्या कटऑफमध्ये विक्रमी वाढ
अकरावीच्या सर्वच शाखांच्या कटऑफमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. एचआर कॉलेजचा कॉमर्सचा कटऑफ दुसऱ्या यादीत 92.4 टक्क्यांवर होता या यादीत तो तब्बल 97.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर झेवियर्स कॉलेजचा आर्टस्चा कटऑफ 92.8 टक्क्यांवरून 97.2 वर पोहोचला आहे. रुईयाच्या सायन्सचा कटऑफ या यादीत 95.4 टक्क्यांवर असून दुसऱया यादीत तो 92.4 टक्क्यांवर होता. वझे-केळकर कॉलेजचा आर्टस्चा कटऑफ 88 वरून 92.2 वर, कॉमर्सचा कटऑफ 92 वरून 92.6 वर, तर सायन्स शाखेचा कटऑफ 92 टक्क्यांवरून 96.2 वर गेला आहे. चांगले गुण असूनही पहिल्या व दुसऱया यादीत मिळालेला प्रवेश अनेक विद्यार्थ्यांनी नाकारला होता. या विद्यार्थ्यांनी तिसऱया यादीत अर्ज केल्याने कॉलेज कटऑफमध्ये वाढ झालेली दिसत आहे.
तिसऱया यादीतील शाखानिहाय प्रवेश
शाखा उपलब्ध जागा प्रवेश
आर्टस् 25,823 4332
कॉमर्स 89,037 31,558
सायन्स 53,520 16,914
एचएसव्हीसी 2480 250
एकूण 1,70,860 53,054
काही कॉलेजांचे कटऑफ
आर्टस कॉमर्स सायन्स
एचआर – 97.2 –
झेवियर्स 97.2 88.4 92
केसी 87.8 91.8 87.6
जयहिंद 92.2 92 88.4
रुईया 93.4 – 95.4
पोदार – 92 –
रुपारेल 87 90.2 92.4
एसआयईएम – 85.8 –
साठय़े 80.8 89.4 91.8
डहाणूकर – 90.2 –
भवन्स 78.4 89.6 89.8
मिठीबाई 90.4 91.4 89.2