मुंबईतील पर्यावरण संतुलन टिकवून ते आणखी वाढवण्यासाठी मुंबई महापालिका वेळोवेळी पावले उचलत असते. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून कुर्ला, पवई आणि बोरिवलीत सुमारे चार एकरवर साडेतीन हजार वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या हिरवाईत आणखी वाढ होणार आहे. दरम्यान, पालिका क्षेत्रात आणखी 29 ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरातील झाडांची निगा कशी राखावी, त्यांचे संगोपन कसे करावे, वृक्ष लागवड क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवण्यात येतील, झाडांची पडझड कशी रोखावी या विषयांवर चर्चा करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि पर्यावरण संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ञांची पालिका मुख्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्तांसह ‘प्रोजेक्ट मुंबई’चे शिशिर जोशी, पार्ले वृक्ष मित्र संघटनेचे अनिकेत करंदीकर, फ्रेंड्स ऑफ ट्रीजचे डॉ. अशोक कोठारी, तुषार देसाई, अदिती काणे, उद्यान विज्ञानतज्ञ रॉबर्ट फर्नांडिस, अनिल राजभर, ‘हरियाली’चे आठल्ये, ‘वातावरण फाऊंडेशन’चे भगवान केशभट, ‘मिशन ग्रीन मुंबई’चे सुभाजीत मुखर्जी, ‘मियाम ट्रस्ट’चे नितू जोशी, ‘नेचर फॉरेवर’चे मोहम्मद दिलावर, ‘मेगा फाऊंडेशन’च्या अनुषा अय्यर उपस्थित होते.
पुरातन वृक्षांचे संगोपन करणार
मुंबईत अनेक ठिकाणी पुरातन वृक्ष आहेत. त्यांचे संगोपन करण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत आहे. धोकादायक ठरणाऱया झाडांच्या फांद्यांची शास्त्राsक्त पद्धतीने छाटणीही वेळच्या वेळी करण्यात येते. यासह अधिकाधिक ठिकाणी वृक्षांची लागवड कशी वाढवता येईल, यासाठीदेखील महापालिका प्रयत्नशील आहे.
वृक्षवाढीसाठी विविध पर्यायांचा वापर
मुंबईतील झाडांचे आयुर्मान कसे वाढवावे, झाडांची छाटणी करताना घ्यायची काळजी, पुरातन झाडांचे जतन कसे करावे, दुभाजकांमध्ये कोणती झाडे लावावीत आणि ती लावताना कोणती काळजी घ्यावी, झाड दत्तक घ्यावे, ‘एक डॉक्टर -एक झाड दत्तक’ उपक्रम राबवावा, महापालिकेच्या उद्यानांमध्ये पक्ष्यांसाठी बारमाही पाण्याची सोय करावी, उड्डाणपुलांखाली जागेचा वापर वृक्ष लागवडीसाठी करावा, नागरी वने (मियावाकी) वाढवावीत, शाळांमध्ये जनजागृती करावी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणात सहभाग वाढवावा, असा विविध पर्यायांचा उपयोग केला जाणार आहे.