वरळी येथील हिट अॅण्ड रनचे प्रकरण ताजे असतानाच आज सकाळी मुलुंडमध्ये हिट अॅण्ड रनची घटना घडली. भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना समोरून जोराची धडक दिली. यात दोन्ही रिक्षांचे चालक तसेच दोन प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर कारचालकाने कार सोडून पळ काढला, पण मुलुंड पोलिसांनी चालक विजय गोरे याला अटक केली.
मुलुंड पश्चिमेकडील डम्पिंग रोडवर सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास वेगात चाललेल्या ऑडी कारने समोरून येणाऱया एका रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात संतोष वालेकर (49), विवेक जैस्वाल (26) या दोघा रिक्षाचालकांसह प्रकाश जाधव (46) आणि हनमंत चव्हाण (57) हे दोन प्रवासी जखमी झाले. तिघांवरही उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर बिथरलेल्या विजयने कार तेथेच सोडून पळ काढला, पण हा प्रकार कळताच मुलुंड पोलिसांनी माग काढत कांजुरमार्ग येथे पळून गेलेला चालक विजय गोरे याला पकडले. प्रकाश जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विजयला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.