मुंबई महापालिकेच्या आर मध्य वॉर्डमध्ये नुकत्याच बांधण्यात आलेल्या गोराई-शेपाली मार्गाची नित्कृष्ट कामामुळे पावसाळ्यात खड्डय़ांनी चाळण झाली आहे. कंत्राटदार आणि पालिका कर्मचाऱयांच्या संगनमताने आणि भ्रष्टाचारामुळे हा नवीन मार्ग उखडला आहे, असा आरोप वॉचडॉग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केला आहे.
बोरिवलीतील गोराई शेपाली मार्ग प्रगती एंटरप्राईज या कंत्राटदार कंपनीने 2023मध्ये बांधला. हा मार्ग नवीन असून मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता जागोजागी उखडला आहे. मात्र गोराई-शेपाली मार्गावरच खड्डे पडले आहेत असे नाही, तर प्रगती एंटरप्राईजने आतापर्यंत बांधलेल्या सर्वच रस्त्यांना मोठय़ा भेगा आणि खड्डे पडले असून याबाबत स्थानिकांनी मुंबई महापालिकेकडे नित्कृष्ट रस्त्यांबद्दल तक्रारी केल्या आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱयांबरोबर मिळून प्रगती एंटरप्राईज अजूनही कामे मिळवत असून पालिका आयुक्तांनीही या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पालिका आयुक्तांनी या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने केली आहे. आरे दूध कॉलनीतील रस्त्याचीही अशीच चाळण झाली आहे. प्रगती एंटरप्राईज आणि पालिकेतील भ्रष्ट अधिकारी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करत नसल्याचा आरोपही वॉचडॉगने केला असून कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
खड्डा माझा लाडका
वॉचडॉग स्वयंसेवी संस्थेने आज सहार मुंबई येथे ‘खड्डा माझा लाडका’ असे फलक आणि टी-शर्ट घालून भर पावसात मुंबई महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि प्रगती एंटरप्राईज या कंत्राटदाराविरोधात जोरदार निदर्शने केली.