पावसाळा सुरू होताच चाहूल लागते ती गणरायाच्या आगमनाची. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गणेशोत्सवाच्या काळात पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या मिठाई आणि फुलांसाठी अवाच्या सवा दर आकारून सर्वसामान्यांची अक्षरशः लूट केली जाते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात मिठाई आणि फुलांच्या दरावर नियंत्रण ठेवा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यंदा 7 सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून 17 सप्टेंबर रोजी बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दोन लाखांहून अधिक घरगुती गणपती आहेत. वाढती महागाई लक्षात घेता गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात फुले आणि मिठाईचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा, जेणेकरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर्वसामान्य गणेशभक्तांना दिलासा मिळेल.
मावा, मिठाईची तपासणी करा
गणेशोत्सवाच्या काळात गुजरातवरून येणारा मावा हा दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकावर गाडय़ातून उतरवल्यावर फलाटावर काही काळ पडलेला असतो. स्थानकात असलेल्या घुशी उंदरांमुळे मिठाई खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने मावा, मिठाईची तपासणी करावी, अशी मागणीदेखील ऍड. दहिबावकर यांनी केली.