आयएनएस ब्रह्मपुत्राला नौदल गोदीत आग

भारतीय नौदलाच्या मुंबईतील गोदीत देखभाल-सुधारणा सुरू असलेल्या आयएनएस ब्रह्मपुत्रा युद्धनौकेला रविवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल 2000मध्ये नौदलात दाखल झालेली ही युद्धनौका एका बाजूला पूर्ण कलंडली असून तिच्यात पाणी शिरले आहे. एक खलाशीही बेपत्ता आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी नेव्हल डॉकयार्ड अग्निशमन दल आणि बंदरातील इतर जहाजांच्या सहाय्याने सोमवारी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणली. मात्र जहाजाच्या तपासण्या सुरू असतानाच दुपारनंतर जहाज एका बाजूला कलंडू लागले. आता ते संपूर्णपणे एका बाजूला कलंडले आहे. यामुळे जहाजावरील युद्ध यंत्रणांसह अनेक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. हे जहाज पुन्हा उभे करण्याचे अवघड आव्हान नौदलाला पेलावे लागणार आहे.