यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला टेबल टेनिस या खेळातही पदकाची आशा आहे. महिला टेनिसपटू मनिका बत्राकडे ऑलिम्पिकच्या अनुभवाची शिदोरी आहे. मागील टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र, ‘यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी टोकियोतील चुका करणार नाही. एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष्य केंद्रित करेन’, अशी प्रतिक्रिया मनिका बत्राने दिली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी टेबल टेनिसपटू वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात पदकासाठी कौशल्य पणाला लावणार आहेत. हिंदुस्थानच्या महिला संघाला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून देण्यात मनिका बत्राने मोलाची भूमिका बजावली होती. ऑलिम्पिकच्या इतिहासात यंदा प्रथमच हिंदुस्थानच्या टेबल टेनिस संघाने पात्रता मिळविली आहे.
मनिका बत्रा म्हणाली, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी पदकावर लक्ष्य केंद्रित करण्यापेक्षा एकएका लढतीवर फोकस करणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बरेच काही शिकायला मिळाले. त्या ऑलिम्पिकमध्ये ज्या चुका केल्यात त्याची पुनरावृत्ती यावेळी अजिबात होणार नाही. शिवाय यावेळी मी मानसिकदृष्टयाही बरीच प्रगल्भ झाली आहे. माझे मनोबलही कमालीचे उंचावले आहे. पदकासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूपुढे आव्हान उभे करणे हे माझे पहिले लक्ष्य असेल. स्पर्धेत हळूहळू आगेकूच करायची अन् कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ करण्यासाठी सर्वस्व झोकून द्यायचे, असा माझा मास्टर प्लॅन असल्याचेही मनिकाने सांगितले.
‘यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये कोर्टवर सर्वस्व पणाला लावण्यात कुठलीच कसर सोडणार नाही. हिंदुस्थानच्या टेबल टेनिस संघाने प्रथमच ऑलिम्पिकची पात्रता मिळवून मोठी कामगिरी केली आहे. आम्ही सर्व खेळाडू शिबिरात सोबतच सराव करतोय. सर्वोत्तम कामगिरी केल्यास यावेळी आम्हाला पदक जिंकण्याची संधी असेल.’
मनिका बत्रा