सहापैकी एक जोडपे आई-बाबा होण्यापासून वंचित, बदलत्या जीवनशैलीमुळे हार्मोन्समध्ये कमालीचे बदल

प्रातिनिधिक फोटो

जगभरात जीवनशैलीत मोठा बदल होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हिंदुस्थानातील जोडप्यांमधील हार्मोनमध्ये बदल झाले आहेत. त्यांच्यात वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ते आई आणि बाबा होण्यात अयशस्वी ठरू लागले आहेत. हिंदुस्थानातील सहापैकी एका जोडप्याला बाळ होईना झाले आहे, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 25 जुलै रोजी आयव्हीएफ दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी दिलेली ही माहिती चिंताजनक आहे. हिंदुस्थानातील 2.7 कोटी जोडपी ही वंध्यत्वाने ग्रस्त आहे. सहापैकी एक जोडपे या संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे देशातील सामाजिक आणि आर्थिक प्रगतीवर दूरगामी परिणाम होत आहेत. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, प्रजनन दर शहरी भागात 1.6 आणि ग्रामीण भागात 2.1 आहे. 2025 पर्यंत हिंदुस्थानचा प्रजनन दर 1.29 पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. जो 2.1 च्या दरापेक्षा खूपच कमी आहे. याचाच अर्थ सहापैकी एक जोडपे या समस्यांना सामोरे जात आहेत. 22.5 टक्के महिलांना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमला सामोरे जावे लागत आहे.