
बालभारतीने तयार केलेल्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील मराठी कवितेत चक्क इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे. या कवितेचे पान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱयांनी बालभारतीच्या बालबुद्धीचे चांगलेच धिंडवडे काढले आहेत. मराठी कवितेत मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द का वापरले आहेत? असा सवालही युजर्सकडून केला जात आहे. बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकात एक कविता आहे. या कवितेचे नाव आहे ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये लिहिलेय, ‘वन्स मोअर, वन्स मोअर झाला शोर!’ वन्समोअर हा इंग्रजी शब्द मराठी भाषेच्या पुस्तकातील कवितेत वापरल्यामुळे सोशल मीडियावर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. एका फेसबुक युजरने ही कविता सोशल मीडियावर शेअर केली. यावरून बालभारतीला चांगलेच लक्ष्य केले जात आहे. किमान मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द वापरायला हवेत, असे अनेक युजर्संनी म्हटले आहे. या पोस्टवर अनेक युजर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काही युजर्संनी संताप व्यक्त केला आहे.