चहा विक्रेत्याची मुलगी बनली सीए, हृदयस्पर्शी व्हिडीओ होतोय व्हायरल

दिल्लीतील एका चहा विक्रेत्याची मुलगी सीए परीक्षा पास झाली. सीएचा निकाल लागल्यानंतर सर्वात आधी बापाची गळाभेट घेत ही तरुणी सांगतेय, बाबा मी सीए झाले. बाप आणि लेकीच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटिजन्स तोंडभरून बाप आणि लेकीचे कौतुक करत आहेत. अमिता प्रजापती असे या तरुणीचे नाव आहे. ती दिल्लीची रहिवासी आहे. तिच्या वडिलांनी नातेवाईकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला पूर्ण पाठिंबा दिला. वडिलांच्या पाठिंब्यामुळेच तिचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि त्यामुळेच तिचे चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत झाली, असे अमिताने सांगितले. परीक्षांमध्ये जेवढी मेहनत मुले घेतात, तेवढीच मेहनत पालकही घेत असतात. परीक्षा जवळ आल्यावर जशी धाकधूक मुलांना असते, तशीच भीती पालकांनाही वाटत असते. पण जेव्हा मुले ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात तेव्हा आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाप-लेकीचा आनंद दाखविणारा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आता समोर आला आहे.