
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची यंदाची निवडणूक रंगतदार आणि धक्कादायक ठरली आहे. त्यात अनेक प्रयोग आणि अंक पाहायला मिळत आहेत. वाचाळवीर ट्रम्प विरुद्ध मुखदुर्बल जो बायडेन हा माजी–आजी राष्ट्राध्यक्षांमधील पहिला अंक संपत नाही तोच ट्रम्प यांच्यावरील गोळीबार, त्यांचे बचावणे आणि त्याचा त्यांनी उचललेला राजकीय फायदा हा दुसरा अंक खळबळजनक ठरला. आता बायडेन यांच्या माघार नाटय़ाचा नवा अंक सुरू झाला आहे. त्यात कोणाकोणाचे ‘प्रवेश’ होतात आणि त्यातून कुठले ‘प्रयोग’ रंगतात, यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या यंदाच्या निवडणूक नाटय़ावर कसा ‘पडदा’ पडतो, हे ठरणार आहे!
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अखेर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल-परवापर्यंत बायडेन महाशय निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्यास अजिबात तयार नव्हते. आपण निवडणूक लढविणारच असे ते वारंवार सांगत होते. अमेरिकेसारख्या जगातील बलाढय़ देशाचे राष्ट्राध्यक्षपद भूषविणे हा सर्वोच्च सन्मान असल्याचे तुणतुणेही त्यांनी वाजविले होते. या पदावर निवडून येण्याची त्यांची इच्छा आणि तयारी त्यांनी अजिबात लपवून ठेवली नव्हती. मात्र उशिरा का होईना, त्यांना त्यांच्या पायाखाली काय जळते आहे याची जाणीव झाली. खरे म्हणजे बायडेन यांना हे शहाणपण आधीच सुचायला हवे होते. एक तर वय आणि प्रकृतीच्या तक्रारी पाहता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरायलाच नको होते. तरीही बायडेन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाचे बाशिंग बांधून स्वतःला प्रचारात मिरवत होते. हेच मिरवणे त्यांना आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला महाग पडले आहे. त्यामुळे बायडेन यांनी आता माघार घेतली असली तरी त्यांचे स्पर्धक आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली आघाडी डेमोक्रॅटिक पक्षासाठी
मोठे आव्हान
ठरणार आहे. बायडेन यांनी सुचविल्याप्रमाणे विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळाली तरी बायडेन यांच्या हट्टामुळे हातातून निसटून गेलेला महत्त्वाचा प्रचारकाळ आणि बायडेन यांनी केलेल्या चुकांचा डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकप्रियतेला बसलेला फटका हा खड्डा कमला हॅरिस कशा भरून काढणार, हा प्रश्न आहे. हा खड्डा भरून काढून ट्रम्प यांनी घेतलेली आघाडी मोडून काढायची, डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल जनमानसात निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा पुसून काढायची आणि नवे आश्वासक वातावरण निर्माण करायचे, असे तिहेरी आव्हान ट्रम्प यांच्यासमोर उभ्या राहणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नवीन उमेदवारासमोर असेल. अमेरिका हा स्वतःला जगाचा तारणहार समजत असल्याने त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची प्रत्येक निवडणूक महत्त्वाचीच असते. यंदाची निवडणूकही चर्चेत होतीच. परंतु ट्रम्प विरुद्ध बायडेन ही लढत सलग दुसऱ्यांदा होत असल्याने रंगतदार ठरणार होती. मात्र निवडणुकीतील सर्वात परिणामकारक टप्पा म्हटल्या जाणाऱ्या निवडणूकपूर्व चर्चेच्या पहिल्याच फेरीत बायडेन हे ट्रम्प यांच्यासमोर
निप्रभ
ठरले. ना त्यांना धड मुद्दे मांडता आले, ना ते स्पष्ट बोलू शकले, ना आपली ढासळलेली शारीरिक आणि मानसिक स्थिती लपवू शकले. शिवाय बायडेन यांनी ‘अमेरिकेत महागाई वाढलेली नाही,’ असे तारे तोडून मतदारांचा रोष ओढवून घेतला. अशा परिस्थितीत डेमोक्रॅटिक पक्ष बायडेन याचा ‘राजहट्ट’ मोडून काढत त्यांना माघार घेण्यास भाग पाडणार हे स्पष्ट होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची यंदाची निवडणूक रंगतदार आणि धक्कादायक ठरली आहे. त्यात अनेक प्रयोग आणि अंक पाहायला मिळत आहेत. मुखदुर्बल जो बायडेन विरुद्ध वाचाळवीर ट्रम्प हा आजी-माजी राष्ट्राध्यक्षांमधील पहिला अंक संपत नाही तोच ट्रम्प यांच्यावरील गोळीबार, त्यांचे बचावणे आणि त्याचा त्यांनी उचललेला राजकीय फायदा हा दुसरा अंक खळबळजनक ठरला. आता बायडेन यांच्या माघार नाटय़ाचा नवा अंक सुरू झाला आहे. त्यात कोणाकोणाचे ‘प्रवेश’ होतात आणि त्यातून कुठले ‘प्रयोग’ रंगतात, यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या यंदाच्या निवडणूक नाटय़ावर कसा ‘पडदा’ पडतो, हे ठरणार आहे!