महायुतीला मतदान केले तरच ‘लाडकी बहिण’ चा लाभ मिळेल; ‘खटाखट’ नंतर पुन्हा एकदा अजित पवारांचा इशारा

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा दिर्घकाळ लाभ मिळवायचा असेल तर महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे लागेल. ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही ती योग्य पध्दतीने पार पडली तरच त्याचा उपयोग होईल.अन्यथा योजना बंद होईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. याआधी लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी महायुतीसमोरील उमेदवाराचे बटन खटाखट दाबा, मतदारसंघात निधीही खटाखट येईल, असा इशारा दिला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या वतीने सोमवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी हा इशारा दिला.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अनेक किचकट अटी कमी करण्यात आल्या आहेत. गरीब तसेच मध्यमवर्गीय पात्र लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारच्या विविध विभागांमार्फत योजनेची माहिती देणे,अर्ज दाखल करून घेणे, अशा बाबी प्राधान्याने मार्गी लावण्यात येत आहेत. आम्ही सर्व खटाटोप केला आहे. त्याचा फायदा आम्हाला मिळायला हवा. त्यासाठी महिला भगिनींनी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे, असा इशाराच त्यांनी दिला.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोफत भरून घेण्याचे आदेश महा ई सेतू केंद्र चालकांना देण्यात आले आहेत.प्रत्येक अर्जासाठी सेतू चालकांना पन्नास रुपये देण्यात येत आहेत.त्यासाठी राज्य सरकारने सव्वा कोटी रुपयांची तरतूद केली आहे.त्यामुळे अर्ज भरून घेण्यासाठी पैशाची मागणी केल्यास ताबडतोब तहसीलदारांकडे तक्रार करा.संबधितांवर कारवाई करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.