आपल्या अटकेचे वृत्त खरे नाही, असे स्पष्ट करत पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी अटकेचे वृत्त फेटाळले आहे. तसेच लोकांनी आपल्या अटकेच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहनही खान यांनी केले आहे.
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी दुबईत अटक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. ते वृत्त खरे नाही, असे खान एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मी राहत फतेह अली खान, तुमचा राहत फतेह अली खान आहे. मी इथे (दुबईला) गाणी रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे… सर्व काही ठीक आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, घृणास्पद अफवांवर लक्ष देऊ नका. हे वृत्त खरे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
फतेह अली खान यांना त्यांचे माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांच्या बदनामीच्या तक्रारीवरून अटक करण्यात आल्याचे वृत्त फिरत आहे. ते वृत्त त्यांनी फेटाळले आहे. तुम्ही माझी शक्ती आहात. माझे प्रेक्षक आणि चाहते ही माझी शक्ती आहेत. देवानंतर माझे चाहते ही माझी शक्ती आहेत, असेही त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.या वर्षाच्या सुरुवातीला एका वादामुळे राहत फतेह अली खान चर्चेत आले होते. राहत फतेह अली खान हे जगप्रसिद्ध कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे आहेत. खान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.