रत्नागिरी जिल्ह्यात पूर ओसरला; रेड अलर्ट असल्याने धोका कायम

गेले आठवडाभर कोसळणाऱ्या संततधार पावसाचा जोर सोमवारी थोडा कमी झाला. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात निर्माण झालेली पूर स्थिती ओसरली आहे. रविवारी आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी मंगळवारसाठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे धोका कायम आहे.

राजापूर शहरात गेले दोन दिवस शिरलेले पुराचे पाणी ओसरले असले तरी अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने अर्जुना नदीही इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे राजापूरकरांवर पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे. गेले दोन दिवस आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या राजापूर शहरातील व्यापाऱ्यांचा सोमवारचा दिवसही चिखल काढण्यात व साफसफाईत गेल्याने दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शनिवारपासून संततधारेने पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पुरस्थिती निर्माण झाली होती . त्यातच रविवारी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने अर्जुना व कोदवली नद्यांचे पुराचे पाणी शहरात घुसले हो . पुराच्या पाण्यात वीज वितरण कंपनीचे अनेक ट्रांसफॉर्मरही पाण्यात गेल्याने गेले दोन दिवस शहरातील अनेक भागातील वीज पुरवठाही खंडीत झालेला होता.

सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने अर्जुना नदीने गाठलेली धोका पातळी कमी झाली असली तरी अद्यापही अर्जुना नदी इशारा पातळीवर वाहत आहे . सोमवारी सकाळनंतर शहरातील जवाहर चौकासह बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी ओसरले असले तरी आजचाचा संपुर्ण दिवस व्यापारी व नागरिकाना चिखल काढण्यात व साफसफाई करण्यात घालवाला लागला आहे. परिणामी आजही व्यापाऱ्याना आपली दुकाने बंद ठेवावी लागल्याने आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे .

जवाहर चौकात असलेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर दुपारपासून एसटी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. पूर ओसरल्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत असले तरी अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने व हवामान खात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने राजापूर शहरावरील पुराच्या पाण्याचे संकट कायम आहे. रविवारी जगबुडी, नांरिगी, काजळी, कोदवली आणि अर्जुना नद्यांना पूर आला होता. हा पूर आता ओसरला आहे.सध्या कोदवली आणि जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे.काजळी नदीचा पूर ओसरल्याने चांदेराई पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.