स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे धर्मवीरांना लहान का दाखवत आहेत? आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचा खरमरीत सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे गद्दारीचे पाप लपवण्यासाठी काढलेला ‘धर्मवीर पार्ट – २’ सिनेमा त्यातील कपोलकल्पित डायलॉगमुळे वादात सापडण्याची चिन्हे आहेत. सध्या या सिनेमाच्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेतील अभिनेते प्रसाद ओक यांच्या तोंडी घुसडलेल्या हिंदुत्वाच्या एका डायलॉगचा समाचार धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी घेतला आहे.

दिघे साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचे हिंदुत्व होते. मग ते हिंदुत्वाच्या आड का येतील? स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे धर्मवीरांना लहान का दाखवत आहेत, असा खरमरीत सवाल केदार दिघे यांनी केला आहे.

‘धर्मवीर ‘नंतर ‘धर्मवीर पार्ट -२’ हा सिनेमा एकनाथ शिंदे यांनी स्वतः चे मार्केटिंग करण्यासाठी आणि शिवसेनेशी केलेल्या गद्दारी चे पाप झाकण्यासाठी काढल्याची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगमध्ये आनंद दिघे यांची भूमिका करणारा अभिनेता प्रसाद ओक आणि शिंदेंची भूमिका करणारा क्षितीज दाते यांचा एक सीन आहे. या सीनमध्ये दिघे बनलेले प्रसाद ओक ‘तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार’ असे शिंदेंच्या भूमिकेतील क्षितीज दाते याला सांगत आहेत. मुळात हा डायलॉगच बोगस आहे, असा समाचार जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी घेतला आहे.

जनता मूर्ख नाही हे लक्षात ठेवा!

मुळात धर्मवीर आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना असे का म्हणतील, असा सवाल केदार दिघे यांनी केला आहे. दिघे साहेबांचे हिंदुत्व हे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे हिंदुत्व होते. मग ते हिंदुत्वाच्या आड का येतील? स्वतःला मोठं दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे यांना लहान दाखवत आहेत का? असले खोटे डायलॉग दिखेंची भूमिका करणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकच्या तोंडी पेरून शिंदे काय साध्य करत आहेत ते समजण्याइतकी जनता मूर्ख नक्कीच नाही, असे खडेबोलही केदार दिघे यांनी मिंध्यांना सुनावले आहे.

भाजपने तेव्हा भगवा रंग भाड्याने दिला होता का?

कुणाशी तरी आघाडी करून भगवा रंग विकला तुम्ही.. असा डायलॉग धर्मवीरांचे पात्र रंगवणाऱ्या प्रसाद ओक यांच्या तोंडी घालण्यात आला आहे. त्याचा जोरदार समाचार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी घेतला. याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मिंध्यांना माझा थेट सवाल आहे.. ज्या भाजपबरोबर तुम्ही आता आहात त्याच भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर आघाडी केली होती. तेव्हा तुम्ही भगवा रंग भाड्याने दिला होता का? आता केंद्रामध्ये तुम्ही चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्याबरोबर सत्तेत आहात. मग या दोघांबरोबर आघाडी करून तुम्ही भगवा रंग भाड्याने वापरायला दिला आहे काय? जमत असेल तर ट्रेलर बनवून याचे थेट उत्तर द्या, असे आव्हानच संजय घाडीगावकर यांनी मिंधे व भाजपला दिले आहे.