
कोकण किनारपट्टी, मुंबई, कोल्हापूर, सांगली वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला होता. आज सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं चांगली हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच धरणक्षेत्रांनाही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
विदर्भात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसानं इथे चांगली बॅटिंग केली असून बळराजा सुखावला आहे. पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
शिवाय, मुंबईतील पवई तलावाचा जलस्तर वाढलाय, पवई तलावातील मगरी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना पवई तलावाच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्यासारखी स्थिती आहे. काही भागात रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा फटका बसला आहे. गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना 22 जुलै, 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील तीन तासासाठी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना नदीला देखील पूर आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील छोटे काजवे आणि काही छोटे पुल पाण्याखाली गेले आहेत. रस्ते, पुल पाण्याखाली गेल्यानं वाड्या वास्त्यांचा मुख्य गावांपासून संपर्क तुटला आहे. बऱ्याच भागात भात शेती पाण्याखाली गेली आहे.
नाशकात पावसाची हजेरी
अर्धा जुलै महिना संपल्यानंतरही पावसानं नाशिकमध्ये चांगली हजेरी लावली नव्हती. जूनचे काही दिवस वगळता नाशकात पावसाच्या सरी काही कोसळल्या नसल्यानं नाशिककरांना चिंता लागली होती. मात्र सोमवारी पहाटेपासून नाशिक शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाच्या सरी सुरू आहेत. यामुळे बळीराजाची चिंता काहीशी कमी झाली आहे. नाशिकच्या आसपासच्या परिसरात आजही मोठ्या प्रमाणात शेती हाच मुख्य व्यवसाय असून सगळ्यांच्या नजरा चांगल्या पावसाकडे लागल्या होत्या. गंगापूर धरणातही 34 टक्के पाणीसाठी शिलक्क असल्यानं पिण्याच्या पाण्याची देखील चिंता होती. मात्र हा पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिला तर पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.