
गुरू हा जीवनाचा आधार, करतो जीवनाचा उद्धार।। हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी मराठी माणसाच्या जीवनाचा उद्धार केला. आजही त्यांचे विचार तमाम मराठीजनांना आणि शिवसैनिकांना नवचैत्यन्य देत असतात. न्याय्यहक्कांसाठी संघर्षाचे बळ देत असतात. आज गुरुपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी असंख्य शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना गुरुवंदना अर्पण केली.
आज सकाळपासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण केली. शिवसेनाप्रमुखांना आवडती चाफ्याची फुले त्यांच्या आसनावर वाहून सर्वजण नतमस्तक झाले. बाळासाहेब आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीलाही चाफ्याचा पुष्पहार अर्पण करण्यात आला. अनेक ज्येष्ठ शिवसैनिकही यावेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिकांबरोबरच आबालवृद्ध शिवसेनाप्रेमीही ‘मातोश्री’वर गुरुवंदनेसाठी मोठय़ा संख्येने आले होते. यावेळी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने मातोश्रीचा परिसर दुमदुमला. शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावरही मोठय़ा संख्येने शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिक पुष्पांजली अर्पण करून नतमस्तक झाले.
आपला प्रत्येक श्वास भगव्यासाठी आहे!
गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्वागत करतानाच त्यांची आस्थेने विचारपूसही केली. शिवसैनिकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचेही आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे त्यावेळी त्यांना म्हणाले की, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वांचे गुरू आहेत. आपण सर्व त्यांच्यासमोरच नतमस्तक होऊया. शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले कार्य अखंडपणे करत राहूया. आपला प्रत्येक श्वास भगव्यासाठी आहे अशा विचाराने काम करत राहूया.’