पावसाचा मेगाब्लॉक! मुंबईत संततधार, भरदिवसा अंधार

मुंबईत सलग दोन दिवस तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात आठवडाभरापासून कोसळत असलेल्या तुफान पावसाने चांगलेच झोपडून काढले. विदर्भालाही दोन दिवसांपासून पावसाने तडाखा दिला असून भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे. मुंबईत आज सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते ब्लॉक झाले. मुलुंड येथे झाड पडले तर घाटकोपरमध्ये दरड कोसळली. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये गेल्या आठवडय़ापासून पावसाचा कहर सुरू असून खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील अर्जुना, कोदवली नदीचे पाणी शहरातील चौकात शिरले. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये आजही पावसाचा जोर कायम असून चंद्रपूरमध्ये पावसामुळे दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले.

जून महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या अखेरीला दमदार हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पालघर, कोकण पट्टय़ासह विदर्भाला चांगलेच झोडून काढले. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून उपनगरापेक्षा मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. एलबीएस रोड, प्रभादेवी, अंधेरी, चेंबूर, संगमनगर वडाळा, हिंदमाता, परळ टीटी, मुलुंड, घाटकोपर, पुर्ला नेहरूनगर, गोरेगाव, मालाड, वांद्रे, नाना चौक, गोवंडी- मानखुर्द, चुनाभट्टी, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी हे सखल भाग पाण्याखाली गेले. मुलुंड येथील वालजी लड्डा मार्ग येथे झाड पडल्यामुळे वाहतूक खोळंबली तर घाटकोपरमध्ये दरड कोसळली. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरच्या लोकल उशिराने धावत होत्या.

मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गात ‘यलो अलर्ट’;  रायगड, रत्नागिरीत ‘ऑरेंज अलर्ट’ 

मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून अनेक भाग पाण्याखाली गेले. हवामान विभागाने पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गात ‘यलो अलर्ट’ तर रायगड, रत्नागिरीला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

19 झाडे, 6 शॉर्ट सर्किट 

मुंबई शहर व उपनगरात 19 ठिकाणी झाड, झाडांच्या फांद्या कोसळल्या. शहर व पश्चिम उपनगरात 6 ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. शहर व उपनगरात घर व घराचा भाग कोसळण्याच्या आठ घटना घडल्या.

प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ अलर्ट मोडवर 

मुंबईसह राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे  एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका यांनी सतर्क राहावे आणि रहिवाशांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन व व्यवस्थापन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

नद्यांनी इशारा पातळी ओलांडली  

खेड शहरातील जगबुडी नदी सातत्याने धोका पातळी ओलांडत असल्याने बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरून मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. जिह्यातील काजळी, कोदवली आणि मुचपुंदी नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. रत्नागिरीतील काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पुलावर पाणी आल्याने गावांचा संपर्प तुटला आहे.

सिंधुदुर्गात आतापर्यंत 71 टक्के पाऊस  

गेल्या वर्षी आजच्या दिवशी 1638.5 मिलीमीटरच्या सरासरीने पाऊस झाला होता तर चालू वर्षी आजच्या दिवशी 2455.86 मिमी पाऊस झाला आहे. तुलनात्मकदृष्टय़ा पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल 817 मिमी मीटर सरासरी पाऊस जास्त झाला आहे.

चार दिवस समुद्रात उंच लाटा उसळणार 

समुद्रात 22 ते 25 जुलैदरम्यान 4.72 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत.  सोमवार, 22 जुलैला दुपारी 12.50 वाजता 4.59 मीटरच्या, मंगळवार, 23 जुलैला दुपारी 1.29 वाजता 4.69 मीटरच्या, बुधवार 24 जुलैला दुपारी 2.11 वाजता 4.72 मीटरच्या तर गुरुवार, 25 जुलैला दुपारी 2.51 वाजता 4.64 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा परिणाम दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर जाणवत आहे.

500 घरांची, 200 पेक्षा जास्त दुकानांची पडझड

सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे 500 पेक्षा जास्त घरांची, 200 पेक्षा जास्त दुकानांची, मांगर, कोठय़ांची पडझड झाली. दोघांचा मृत्यू झाला तर हजारो कोंबडय़ा, दुधाळ जनावरे यांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांच्या नुकसानीचा आकडा पाहता साडेपाच कोटींच्या घरात आहे.

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आज दुपारी साडेतीन वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नागपुरात दोघांचा बुडून मृत्यू

बेसा-बेलतरोडी नाला दुथडी भरून वाहत होता. तो पाहाण्यासाठी सुधा विश्वेश्वर वेरुलकर (70) या शनिवारी सायंकाळी गेल्या. परंतु, पाय घसरून नाल्यात पडल्या आणि वाहून गेल्या. रविवारी त्यांचा मृतदेह हाती लागला. तर आणखी एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेहदेखील रविवाही आढळून आलाशनिवारीच नागनदीच्या पुरात वाहून गेलेले भोजराज धुलीचंद्र पटले (52) यांचाही मृतदेह आढळून आला.

घाटकोपरच्या जगदुशानगरवर दरड कोसळली 

मुंबईत मालाड आणि ग्रॅण्ट रोडनंतर जोरदार पावसामुळे पडझडीचे सत्र सुरू असून घाटकोपरच्या जगदुशानगर येथील काजोळकर सोसायटीतील घरांवर दरडीचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने नुकसान झालेल्या घरांतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

कोकणात आभाळ फाटले… खेड आणि चिपळूणला पुराचा धोका

अतिमुसळधार पावसाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात हाहाकार उडाला आहे. आठवडाभर सुरू असलेला पावसाचा धुमापूळ आजही सुरू होता. खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बाजारपेठेत पाणी शिरले. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले. रत्नागिरी तालुक्यात काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने चांदेराई पुलावर पाणी आले.

जगबुडीवरील पुलाला भगदाड

मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या रस्ते कामाची पुन्हा पोलखोल झाली असून रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे जगबुडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. दोन्ही बाजूकडील ही वाहतूक आता एकाच पुलावरून सुरू करण्यात आली आहे. या पुलाची पाहणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

10 तासांतील पावसाची नोंद (मिमी)

  • सांताक्रुझ       141
  • कुलाबा  40.3
  • ठाणे    74
  • माथेरान  70
  • डहाणू  138.4
  • रत्नागिरी  62.2
  • सातारा  14.4
  • कोल्हापूर       41.5