शिवसेनेतून गद्दारी केलेल्या मिंधे गटासह अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी, 23 जुलैला महत्त्वाची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिंधे व अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्या निर्णयाला आव्हान देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दोन वेगवेगळय़ा याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी घेताना न्यायालय नार्वेकर यांचा निर्णय बदलणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतर्फे पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असली तरी शिवसेनेच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घ्या, अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी 10 जुलैला सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यानुसार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोहर मिश्रा यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. सुरुवातीला शिवसेनेने याचिका केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्याचे आदेश दिले होते. मात्र नार्वेकर यांनी मिंधे गटाचे 16 आमदार तसेच अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर 23 जुलैची सुनावणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
आमदारकी जाणार? गद्दारांना धाकधूक
त्रिसदस्यीय खंडपीठाने मागील सुनावणी वेळी राहुल नार्वेकर यांना या प्रकरणातील मूळ कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नार्वेकर यांना सर्व मूळ कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. खंडपीठाने शिवसेनेच्या याचिकेची गंभीर दखल घेत कागदपत्रे मागवल्यामुळे नार्वेकर यांचा निर्णय बदलला जाणार का? आमदारकी गमवावी लागणार का? अशी धाकधूक गद्दार आमदारांना वाटत आहे. त्यामुळे सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.