अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्यामधील वादविवादादरम्यान बायडेन यांना आपली भूमिका ठामपणे मांडता आली नव्हती. दरम्यान, गेल्या काही दिवसांत डेमोव्रॅट्स पक्षातूनच बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी असे प्रयत्न सुरू होते. या सगळ्याची परिणती बायडेन यांच्या घोषणेत झाल्याचे समोर आले आहे. पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याची माझी इच्छा आणि तयारी होती पण देशाचे आणि डेमोव्रॅट्स पक्षाचे हित लक्षात घेऊन मी माघार घेण्याचा निर्णय घेतला. विद्यमान राष्ट्राध्यक्ष या नात्याने उर्वरित कार्यकाळात माझ्या कर्तव्यांना पूर्णतःन्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. यासंदर्भात काही दिवसातच देशवासीयांना संबोधित करेन’, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.
कमला हॅरिस उमेदवार?
कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार करणं हा माझा सर्वात योग्य निर्णय ठरला. आता पक्षाने त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी. त्यास माझे समर्थन आहे, असे बायडेन यांनी नमूद केले. त्यानुसार कमला हॅरिस यांची उमेदवारी जाहीर झाल्यास ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस लढत होणार आहे.