
नाकाबंदीदरम्यान मोटरसायकलस्वाराने पोलिसाला धडक देऊन जखमी केल्याची घटना शनिवारी अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली. संदीप पवार, समीर जाधव, दीपक पवार अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
रामचंद्र सावंत हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. शनिवारी ते रात्री मोबाईल गाडीवर डय़ुटीला होते. रात्री महाकाली केव्हज रोड येथे नाकाबंदी लावली होती. पोलीस हवालदार तानाजी आव्हाड हे बॅटन घेऊन वाहने रस्त्यावर हळू चालवण्यास इशारा देत होते. नेल्को बस स्टॉप येथे पोलीस हवालदार वाघमारे आणि महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान हे वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मोटरसायकलवर तीन जण विनाहेल्मेट येत असल्याचे दिसले. तेव्हा वाघमारे यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र मोटरसायकलस्वाराने मोटरसायकल न थांबवता जोरात चालवली.
मोटरसायकल जोरात चालवून त्याने सावंत यांच्या पायाला धडक दिली. हा प्रकार लक्षात येताच त्यांना सहाय्यक फौजदार पवार यांनी उचलले. त्याचा फायदा घेऊन ते तिघे पळून जाऊ लागले. त्यानंतर आव्हाड, वाघमारे यांनी पाठलाग करून त्या तिघांना पकडले. जखमी झालेल्या सावंत यांच्यावर उपचार करण्यात आले. संदीप हा डिलिव्हरी बॉय असून तो मोटरसायकल चालवत होता, तर समीर आणि दीपक हे मोटरसायकलवर बसले होते.