
स्टॉक ब्रोकिंग घोटाळय़ातील मुख्य आरोपीशी संपर्क तसेच व्हॉट्सअॅपवरून मेसेजची देवाणघेवाण केल्या प्रकरणी अटक केलेल्या स्टॉक ब्रोकरला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीशी मेसेजच्या माध्यमातून संपर्क ठेवला म्हणून कुणी गुन्हेगार ठरत नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने आरोपी मनीषा शाहला जामीन मंजूर केला.
कस्तुरबा मार्ग पोलिसांनी 3 फेब्रुवारी रोजी शाहला अटक केली होती. जे.एम. फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला गुन्हा नोंदवला होता. शेअर निष्क्रिय असलेल्या शेअरधारकांचे बनावट डिमॅट खाते बनवून पैसे काढले आणि 14 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाहसह तिघांना अटक केली होती. अरविंद गोयल हा घोटाळय़ाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले होते. शाहने जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. शाह व गोयलने एकमेकांना व्हॉट्सअॅप मेसेज केले. याव्यतिरिक्त शाहचा गोयलशी संबंध असल्याचा इतर कुठलाही पुरावा नाही, असा युक्तिवाद अॅड. सुजय कांथावाला व अॅड. प्रसाद बोरकर यांनी केला. याची दखल घेत न्यायालयाने शाहला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे निर्देश दिले.
कोर्टाचे निरीक्षण
स्टॉक ब्रोकिंग घोटाळय़ातील मुख्य आरोपीशी केवळ मेसेजच्या माध्यमातून संपर्क ठेवला. यावरून मेसेज करणाऱया स्टॉक ब्रोकरचा शेअरहोल्डर्सची फसवणूक करण्यात मोठा सहभाग असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.