देशभरात पावसाचे थैमान सुरू असून गुजरातमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सौराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला आणि सखल भागात पाणी साचल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पूरग्रस्त भागात नागरिकांसाठी मदतकार्य सुरू केले असून, एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. देवभूमी द्वारका तालुक्यात 12 तासांत 163 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुनागड, गिर सोमनाथ जिल्ह्यातील पाटण-वेरावळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालारधुना धबधब्याचे पाणी वाढल्याने गुजरातमधील नख्तराना येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. धबधब्याला भेट देण्यासाठी गेलेले दोघे त्यात अडकले आणि 2 तास बाभळीच्या झाडाला लटकले. आरडाओरड ऐकून आजूबाजूच्या लोकांनी दोरीच्या सहाय्याने दोघांनाही बाहेर काढले. नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक असेल तर बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तराखंड, आसाम, मेघालय आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
केंद्रीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कर्नाटकातील भूस्खलनग्रस्त उत्तरा कन्नड जिल्ह्यात सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. या भूस्खलनात आतापर्यंत १० लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून, त्यापैकी ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य सुरू असून, उर्वरित ३ जणांचा शोधही सुरू आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने उत्तर-पश्चिम सरकण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातील रैतुआ गावात ढगफुटीमुळे मुसळधार पावसात एक व्यक्ती वाहून गेली असून, आतापर्यंत पावसामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडात सोमवारी पावसासाठी रेड अलर्ट जारी केला असून, राज्याच्या काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
धोक्याचे पर्यटन टाळा, सूचनांचे पालन करा
देशात जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पर्यटनस्थळे बहरली आहेत. मात्र, डोंगर, लेण्या, किल्ले, धरणे, तलाव आदी ठिकाणी पावसाच्यावेळी धोका लक्षात येत नाही. अचानक पाणी वाढल्याने किंवा भूस्खलनामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, धोक्याचे पर्यटन टाळण्याचे आवाहन केले आहे. फोटोसेशन आणि जीवघेण्या रिल्ससाठी अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत.