ऑलिम्पिक क्रीडामहोत्सव आता तोंडावर येऊन ठेपलाय. क्रीडाविश्वातील या सर्वोच्च स्पर्धेसाठी पॅरिसनगरी ऑलिम्पिकमय झालीय. स्पर्धा आयोजकांनी वर्षभरापूर्वी ‘फ्रान्सची राजधानी पॅरिस ही जगातील सर्वात सुरक्षित जागा असेल,’ असे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पॅरिसमधील रस्त्यांवर पोलिसांचा पहारा आणि आकाशात लढाऊ जेट विमानांच्या घिरटय़ा असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पॅरिसच्या रस्त्यारस्त्यांवर जिकडेतिकडे पोलीसच दिसत आहेत. पोलिसांच्या मदतीला सैन्यदलालाही पाचारण करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत ऑलिम्पिक खेळ गावात अर्धा तासात मदत पोहोचेल, अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभ होणाऱ्या सीन नदीच्या किनाऱ्यावर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
युक्रेन अन् गाझा पट्टीतील युद्धाचा परिणाम
युक्रेन आणि गाझा पट्टीत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सला ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे. 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकसाठी जगभरातील 10,500 खेळाडूंसह लाखो क्रीडाप्रेमींना सुरक्षा पुरविणे हेच फ्रान्ससाठी सर्वात मोठे आव्हान असेल. या ऑलिम्पिक क्रीडामहोत्सावर सायबर हल्ल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पॅरिसमध्ये स्पर्धेदरम्यान 45 हजार पोलीस व 10 हजार लष्करी जवानांना तैनात करण्यात आले आहे. दुसऱया महायुद्धानंतरचे पॅरिसमधील हे सर्वात मोठे सैन्यशिबिर होय.
अतिरेकी हल्ल्याच्या प्रतिकारासाठी सज्ज
पॅरिसमध्ये 2015नंतर अल-कायदा व इस्लामिक स्टेट या संघटनेतील अतिरेक्यांनी अनेकदा अदाधुंद गोळीबार व आत्मघातकी हल्ले केलेले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी 24 तास सुरक्षारक्षक पहारा देत आहेत. सुरुवातीला सर्वसामान्य नागरिक हा बंदोबस्त पाहून भयभीत होत होते. मात्र, आता त्यांनाही या बंदोबस्ताची सवय झाली आहे, अशी माहिती सेंटिनेल नावाच्या अतिरेकीविरोधी सैन्यदलाचे डेप्युटी कमांडर जनरल एरिक चास्बोउफ यांनी दिली. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सीन नदीच्या आसपासचा दीडशे किलोमीटर परिसर नो फ्लाय झोन बनविण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील सुरक्षाही आणखी वाढविण्यात आली आहे.