जगभरातून महत्वाच्या बातम्या

बाईक स्टंट करताना मृत्यू

हैदराबादमध्ये बाईकवर स्टंट करताना एका रीलस्टारचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर अन्य एक तरुण जखमी झाला. हैदराबादच्या रचाकोंड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पेद्दा अंमरपेठजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. दोघेही इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी बाईकवर स्टंट करत होते. मात्र, चालकाचे बाईकवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात झाला.

नौदलाच्या जहाजावरील आग आटोक्यात

गोव्याच्या किनारपट्टीवर मर्चंट नेव्हीच्या जहाजाला 19 जुलैला लागलेली आग आटोक्यात आली आहे. या जहाजावर 22 कू मेंबर्स होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हिंदुस्थानी तटरक्षक दलाच्या अधिकायाने दिली. गुजरातमधील मुंद्रा येथून 1,154 कंटेनर घेऊन श्रीलंकेतील कोलंबोकडे निघालेल्या एमव्ही मार्स्क फ्रँकफर्ट जहाजाला गोव्याच्या किनायापासून 102 नॉटिकल मैल अंतरावर आग लागली. त्यात बेंझिन आणि सोडियम सायनेटसारखा धोकादायक माल होता.

गळफास घेण्याचा खेळ जिवावर बेतला

मध्य प्रदेशच्या मुरैना येथे मन सुन्न करणारी घटना घडली. मुरैनातील अंबाह गावातील लहान मुले खेळता खेळता रील बनवत होते. रील बनवण्यासाठी एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास घेण्याचा अभिनय केला. मात्र, हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला आणि काही सेकंदात त्याचा मृत्यू झाला. ज्या मुलाने गळफास घेण्याचा अभिनय केला होता, तो झाडाच्या खाली असलेल्या कठडयावर उभा होता. मात्र, त्याचा तोल गेल्यामुळे तो कठडयावरून खाली पडला आणि झाडाला बांधलेल्या दोरीने त्याचा गळा आवळला गेला.

इब्राहिम इस्कंदर बनले मलेशियाचे 17वे राजे

मलेशियाचे 17 वे राजे इब्राहिम इस्कंदर यांचा शनिवारी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील नॅशनल पॅलेसमध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडला. इस्कंदर पुढील 5 वर्षे मलेशियाचे राजे राहाणार आहेत. 1957 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून मलेशियातील मलय राज्यांचे राज्यकर्ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिरत्या आधारावर सिंहासनावर बसतात. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशिवाय शेजारील देश ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया आणि बहारीनचे राजे हमदबिन इसा अल खलिपा हेही राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत.