चारवेळा यूपीएससी पास करूनही नोकरी नाही…, विकलांग कार्तिक देतोय लढा

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे प्रकरण सध्या गाजत आहे. तिने विकलांग कोटय़ाचा गैरफायदा घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यूपीएससीच्या कारभारावरही टीका होत आहे. अशातच कार्तिक कंसल या विकलांग व्यक्तीने चारवेळा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्याला अद्याप नोकरी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कार्तिक कंसल यांना मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार आहे. ते वयाच्या 14 वर्षांपासून व्हीलचेअर वापरत आहेत. त्यांनी आयआयटी रुरकी येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली. सध्या ते इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. ते 2019 साली ( रँक 813), 2021 (रँक 271) आणि 2022 (रँक 784), 2023 (रँक 829) असे चारवेळा उत्तीर्ण झाले.

2021 मध्ये त्यांची रँक चांगली असल्याने विकलांग कोट्याचा फायदा न घेता त्यांना आयएएस ही पोस्ट मिळायला हवी होती. त्यांच्यामागे असलेल्या उमेदवारांना ही पोस्ट मिळाली, पण मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा आयएएसच्या पात्रता निकषांमध्ये समावेश नसल्याने त्यांना आयएएसची पोस्ट नाकारण्यात आली.

t मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा या आजाराचा समावेश इंडियन रेव्हेन्यू ग्रुप ‘ए’मध्ये आहे. मात्र तिथेही कार्तिकचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यांच्या मांसपेशी कमकुवत असल्याचे एम्सच्या वैद्यकीय मंडळाने सांगितलंय. कार्तिक यांचे मूळ अपंगत्व प्रमाणपत्र त्यांना 60 टक्के अपंग ठरवतं, पण एम्सच्या मेडिकल बोर्डाने त्यांना 90 टक्के अपंग ठरवलं आहे.

t कार्तिक सध्या सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये आपली केस लढत आहेत. त्यांना निवृत्त आयएएस अधिकारी संजीव गुप्ता यांनी पाठिंबा दर्शवला आहे.