>> विनायक
गेल्या 10 तारखेला मराठवाडय़ात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसल्याची बातमी आली आणि 1993 मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपाच्या आठवणी जाग्या झाल्या. ती अनंत चतुर्दशीची रात्र होती. दहा दिवसांचा सार्वजनिक गणपती विसर्जित करून सगळीकडची कार्यकर्ते मंडळी जवळपास उत्तररात्रीच घरी परतली होती. त्या दमलेल्या मंडळींना झोप लागते न लागते तोच पहाटे 3.56 मिनिटांनी तीव्र भूकंपाने अवघा महाराष्ट्र थरथरला. तारीख होती 30 सप्टेंबर. भूकंपाचं केंद्र मराठवाडय़ात ज्या किल्लारी गावात होतं तिथे तर कहरच झाला. साखर झोपेत असलेल्या बेसावध, निष्पाप लोकांवर कठोर काळाची झडप पडली. बऱ्याच अंशी मातीच्या बांधणीची असलेली घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. कित्येक क्षणात बेघर झाले. नियतीच्या या आकस्मिक, अकल्पित आघातातून बाहेर यायला पुढे अनेक वर्षे जावी लागली.
आठवणीतल्या भूकंपातला तो सर्वात भीषण भूकंप. त्यापूर्वी 1967 मध्ये कोयनानगर केंद्रबिंदू असलेला भूकंप झाला होता. असे भूकंप आणि त्सुनामी किंवा हवामानाचं अचूक गणित नसतं. हवामानाचे किंवा वादळांच्या तीव्रतेचे अंदाज जसे चुकतात तसेच भूकंपांचेही. विज्ञानाने प्रगती केल्यामुळे साधारणपणे कोणकोणती भूकंपप्रवण क्षेत्र जगभर आहेत त्याचा अंदाज येतो, पण नेमका कधी, कुठे आणि किती तीव्रतेचा होईल ते सांगणं सोपं नसतं. तसे पृथ्वीवर रोज हजारो भूकंप होतात हे वाचून आश्चर्य वाटेल, पण या ग्रहाची नैसर्गिक संरचनाच अशी आहे की, ज्या भूपृष्टावर आपण राहतो ते पृथ्वीच्या गाभ्यातील लाव्हा रसावर तरंगत असलेल्या आणि अधूनमधून सरकणाऱ्या ‘प्लेट टॅक्टॉनिक’वर आपलं स्थिर- अस्थिर अस्तित्व अवलंबून आहे.
आता थोडय़ाफार प्रमाणात तरी भूकंपांचा अंदाज येतो तो सिस्मोग्राफ किंवा भूमीच्या थरथरण्याचा आलेख नोंदणाऱ्या संवेदनाशील यंत्रांमुळे. त्याला सिस्मॉमीटर असं म्हणतात. त्यावरून साधारण ‘ईसीजी’सारखा दिसणारा आलेख तयार होतो. त्यावर रोजच्या भूकंपांची नोंद होतच असते. त्यातले बहुतांशी सागरतळाशी होतात. कारण त्याखालीसुद्धा जमीन आणि टॅक्टॉनिक प्लेट आहेतच. भूकंपाची नोंद ‘रिश्टर स्केल’ या नावाने मापली जाते. किल्लारीचा भूकंप 6.2 रिश्टर स्केलच्या होता. एक, दोन किंवा अगदी तीन स्केलचा भूकंप झाला तरी केवळ थरथर जाणवते, पण कोणतीही पडझड किंवा हानी संभवत नाही. सागरतळाशी प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला तर मात्र ‘त्सुनामी’च्या भयकारी लाटा उसळतात. समुद्राचं पाणी किनारपट्टी गिळून टाकते.
जपानमधील कुकुशिमा अणुभट्टीत समुद्राचं पाणी वेगाने घुसून 11 मार्च 2011 रोजी जपानसह जगला भयचकित केलं होतं. तो भूकंप रिश्टर स्केलवर 9 तीव्रतेचा म्हणजे हाहाकार उडवणारा होता.
पृथ्वीच्या गाभ्यामध्ये असलेल्या लोह रसावर तरंगणाऱ्या दगडी प्लेट टॅक्टॉनिक खूपच जाड आणि भक्कम अशा असतात. त्यांचं सरकणं मात्र पृथ्वीच्या निर्मितीपासून सुरू आहे. आपला देश ज्यावर वसला आहे ती उपखंडाची ‘प्लेट’ अनेक कोटी वर्षांपूर्वी सरकत, सरकत वरच्या आशियाई प्लेटला सध्या हिमालय आहे तिथे धडकली. त्यामुळे तिथे असलेल्या समुद्राचा तळ उचलला जाऊन जगातला सर्वांत उंच पर्वत तयार झाला. त्याची भूशास्त्रीय माहिती एखाद्या लेखात घेऊ. ही धडक अजून पूर्णपणे थांबलेली नाही. त्यामुळे भूकंपांची धडधड देशात अनेक ठिकाणी जाणवते.
भूकंपाची नोंद करणारे भूकंपन आलेख यंत्र किंवा सिस्मॉमीटर शोधण्याचं काम प्राचीन काळापासून सुरू आहे. समुद्री लाटांच्या बदलत्या स्वरूपावरून किंवा अन्य नैसर्गिक बदलांचा अंदाज आल्याने त्या काळात संभाव्य भूकंपासंबंधी भाकीत केलं जायचं तोही अंदाजच असायचा. आधुनिक पद्धतीचं सिस्मॉमीटर फ्रेंच संशोधक जीन हॉतेफ्युइले यांनी 1703 मध्ये बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1842 मध्ये जेम्स फेबिस यांनी तयार केलेल्या सिस्मॉमीटरचा अंदाज अधिक चांगला ठरला. सिस्मॉमीटर बनवण्याचे असे प्रयोग युरोपात सुरूच होते. 1875 मध्ये किलिनो केच्ची यांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक सेन्सर वापरून भूकंपालेखन यंत्र बनवले.
त्यामुळे भूकंपांचा निदान अंदाज तरी येऊ लागला. परंतु ते थांबवणं माणसाच्या हाती नाही. आपण फक्त स्वतःची आणि सभोवतालची काळजी घेऊ शकतो. या यंत्रांना गुंगारा देऊनही काही भूकंप घडतात. नंतर त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर समजते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगामध्ये आधुनिक काळात म्हणजे बऱ्याच वयस्कर लोकांच्या स्मरणातले अनेक जागतिक भूकंप आहेत. इराणमधलं तबास नावाचं शहरच्या शहर 16 सप्टेंबर 1978 रोजी झालेल्या 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूपंपाने क्षणात भुईसपाट झालं. त्या आपत्तीमध्ये सुमारे 25 हजार लोकांचा बळी घेतला गेला असं म्हटलं जातं. ही झाली भूकंपाची कारणं आणि परिणाम यांची कहाणी व त्यामागचं सोप्या शब्दांतलं विज्ञान. मात्र कोणत्याही आपत्तीत रंजक काय असणार? केवळ योगायोगाने वाचलेल्या काही लोकांच्या करुण कहाण्या तेवढय़ा शिल्लक राहतात. त्यातील रंजक म्हणजे भूकंप झाला तरी गगनस्पर्शी इमारती कशा टिकून राहतात याविषयीचं विज्ञान काय ते पुढच्या लेखात.