मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर भाजपच्या 79 आमदारांचा कार्यक्रम करणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

विधानसभा निवडणुकीपूर्वी सगेसोयरे अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर न केल्यास, तसेच मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण न दिल्यास मराठा समाज या निवडणुकीत भाजपच्या 65 ते 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि अजित पवारांवर त्यांनी हल्लाबोल केला. आंतरवाली सराटीत रविवारी उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहिणीनंतर लाडकी मेव्हणी योजना आणतील, अशी टीका केल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाने तुमच्या आंदोलनात गर्दी केली म्हणून तुम्ही भंपकपणा करता, अशी टीका केली होती. त्यावर जरांगे पाटील म्हणाले की, दरेकरांचा हा घसरगुंडी पडल्यासारखा खेळ झाला, टीका केली नसताना मराठ्यांच्या विरोधात बोलून ते मराठ्यांच्या नजरेत उघडे पडले आहेत. लेकरांच्या डोळ्यातील अश्रूंचा अपमान करून विद्यार्थ्यांच्या वेदना, दुःख समजले नाही, त्या वेदनांना, अश्रूंना दु:ख, भंपकपणा म्हणतात, हे दुर्दैव आहे.

योजना लोकांना नादी लावण्याचे काम
लाडकी बहीण योजनेसाठी आठ -आठ दिवस लोक रांगेत उभे आहेत. हा तुमचाही भंपकपणा, नाटक आहे. लोकांना नादी लावण्याचे काम नाही का? आम्ही योजनेवर टीका केली नाही. फक्त आताच योजना का आणली आणि विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू असून, त्या गर्दीने महसूल कर्मचारी संपावर गेले. प्रवेश प्रक्रिया रखडून पडल्याने शैक्षणिक वाटोळे होऊन नुकसान होत असल्याने बोललो, विरोध केला नाही, असेही जरांगे म्हणाले.

दरेकर भाजपचा गेम करतील
क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा संपवणारे दरेकर दोन नंबरचे मारेकरी आहेत, असे तुमच्यासह दहा- बारा जणांची टोळी होती. दरेकर मराठे संपवण्यासाठी अभियान राबवणार आहेत. देवेंद्र फडणवीस दरेकर यांच्या हातात कासरा देऊ नका, हे तुमचा आणि पक्षाचा गेम करतील. मराठा काही करू शकतात. दरेकर फक्त तुमचे उमेदवार पाडू, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांची माणसे निवडून आणतील. तुम्हाला काय करायचे ते करा, मी मरणाला घाबरत नाही. दरेकर म्हणजे नथ नसलेली तमाशातील मावशी असा टोलाही त्यांनी लगावला.

…तर आंदोलन मागे घेईल
सरकारने दहा महिन्यांत मराठा आरक्षणाबद्दल काय केले हे सिद्ध करून दाखवले तर त्या क्षणी आंदोलन मागे घेईल. मराठा कुणबी एकच नाही हे तुम्ही तरी सिद्ध करा, नाही तर मी तरी मराठा कुणबी एकच आहे हे सिद्ध करतो. या आंतरवालीत. समोर बसून चर्चा करू.

29 ऑगस्टला गर्दी काय ते कळेल
मी, तुमच्या अभियानाला भीत नाही. एसआयटी नेमली, गुन्हे मागे घेतले नाही. निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणूक झाल्यावर मला अटक करतील. बदनामी करण्यासाठी खोटेनाटे व्हिडिओ तयार करताना बदनामीसाठी कोण-कोणाला हाताखाली घेतात हे मला माहीत असून, तुम्ही हेच पापं करत रहा. तुम्ही गर्दीचा अंदाज लावू नका, 29 ऑगस्टला बैठक झाल्यानंतर मुंबईत कळेल गर्दी काय असते. ती पाहण्यासाठी चष्मा लावून या गर्दी बघायला असे ते म्हणाले.

काही मराठा समन्वयक, अभ्यासक यांना हाताशी धरलेले आहेत पण अभ्यासक, समन्वयकांनी यांच्या नादी लागू नये. हे तुम्हाला समाजाच्या नजरेतून उतरवतील. दरेकर यांना फक्त फडणवीस पाहिजे, फडणवीस दरेकर यांच्या माध्यमातून चाली खेळत असतील तर आपल्यालाही चाली खेळाव्या लागतील. भाजपमधील मराठ्यांनी आता सावध व्हावे. दरेकर बोलल्यापासून भाजपमधील वातावरण बिघडले आहे. फडणवीस तुम्ही डाव टाकू नका. मला राजकारणात जायचे नाही. यांचा मला जेलमध्ये टाकण्याचा डाव आहे. मला जेलमध्ये टाकले तर मराठ्यांनी यांची प्रत्येक जागा पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

गोळ्या घातल्या तरी चळवळ सुरूच ठेवणार
दरेकर यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, तू बँकेत घोटाळा केला तरी फडणवीस यांनी तुझे कुटुंब वाचवले. म्हणून तू मराठ्यांच्या विरोधात बोलून उपकार फेडत आहेस. फडणवीस यांनी तुला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले. पण मी समाज वाचवत आहे. मी पुतळ्याखाली बसून इमानदारीने काम करतो, तू उन्हाच्या चटक्यात फडणवीस यांच्याखाली बसलास. तुझी मस्ती पक्षाला महागात पडेल तसेही ते म्हणाले.

भाजपचे 65 ते 79 सीट पडतील
पंढरपूर येथे एका घरात आणि मुंबईत काही आजी-माजी मंत्र्यांची बैठक झाली. यात मराठा आरक्षणामुळे फटका बसेल आणि ६५ ते ७९ सीट पडतील, असे तुमचेच मंत्री म्हणून, दरेकरसारखे बोलत राहिले तर 65 ते 79 सीट पडतील, असे जरांगे पाटील म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, काल तुमचे 2 फ्यूज होते. एक उडाला होता, तुमचा टीव्ही चालला नसेल, मी कुणाचाही नाही, माझा संताप विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने होत आहे.

पवार टेबलाखाली लपू नका
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, पवार टेबलाखाली लपू नका, खाली मान घालून बोलू नका, उगाच नाकातल्या नाकात गुणगुण करू नका. शिष्टमंडळ आले आणि फुकटात चहा पिऊन गेले. चहाची उधारी कोण देणार? त्यात त्यांना साखर असलेली बिस्कीट नको, खारे बिस्कीट कुठून आणायचे आम्ही? तुमची शुगर वाढते. त्याला आम्ही काय करू? पाणी पिऊन गेले. 20 रुपयांच्या बाटलीची उधारी कुठून द्यायची? शिष्टमंडळे नुसती येतात आणि माघारी जातात. अजित पवारांना केवळ शिष्टमंडळ दिसते. कशाला नाटकं करताहेत, शिष्टमंडळाने आतापर्यंत एकतरी केस मागे घेतली का? मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित केला का? सर्टिफिकेट व्हॅलीड केले नाहीत, म्हणजे जातीयवाद सुरू आहे की नाही? नोंदी शोधायचे का बंद केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.