गद्दारांना पाडून पहिली लढाई जिंकली, आता विधानसभाही जिंकूच; बबनराव थोरात यांचा निर्धार

गद्दारांच्या विरोधातील ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून, एक विजय मिळविल्यानंतर विरोधक दुप्पटीने कामाला लागले आहेत. मात्र लाडका भाऊ, लाडकी बहिण अशा योजना फसव्या सरकारने आणल्या तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बाबत जनमानसात असलेली प्रतिमा या बळावर विधानसभा एकजुटीने एकदिलाने लढू व जिंकू, असा विश्वास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदेड-हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी व्यक्त केला.

नांदेड-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शिवसेना पदाधिकार्‍यांच्या वतीने सत्कार व पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार नागेश पाटील आष्टीकर, राज्य संघटक एकनाथ पवार, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, एस.टी.कामगार सेनेचे प्रमुख सल्लागार प्रकाश मारावार, युवासेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर, किनवट विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना बबनराव थोरात यांनी गद्दाराविरुध्दची पहिली लढाई आपण जिंकली आहे. त्यामुळे विरोधक आता दुप्पटीने कामाला लागले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी लाडका भाऊ, लाडकी बहिण अशा फसव्या योजना आणून जनतेची भुलावण करणार्‍या फसव्या सरकारने कितीही आदळआपट केली तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरचा जनतेचा विश्वास कदापी कमी झाला नाही व होणारही नाही, मतदान नावनोंदणी अभियान जोराने सुरु आहे. त्यात सर्व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी लक्ष घालून नव्या मतदारांची नावनोंदणी करुन घ्यावी, जेणेकरुन येणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपल्याला निश्चित यश मिळेल. लबाडांचे दिवस संपले आहेत, गद्दाराचे दिवस संपले आहेत, आता आपली लढाई विधानसभेसाठी आहे, या निवडणुकीत काम करणार्‍या व निवडून येण्याची क्षमता असणार्‍या मंडळींना संधी मिळेल. त्यामुळे एकदिलाने, एक मनाने ही लढाई जिंकण्यासाठी सज्ज व्हा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, ज्योतिबा खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन संजय भोसले यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व शिवसैनिकांच्या वतीने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, राम चव्हाण, मुकुंद जवळगावकर यांनीही आष्टीकर व थोरात यांचा सत्कार केला.